Weather update : पुढचे 24 तास महत्वाचे! हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Weather update : मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज असला तरी विदर्भात वादळी पावसाचे सावट अधिक गडद राहणार आहे.

Weather update : संपूर्ण देशासह महाराष्ट्रात सध्या उष्णतेची तीव्र लाट कायम असून, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामान तज्ज्ञांनी येत्या काही वर्षांत ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व वातावरणीय बदलांमुळे राज्यात अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Weather update)
पुढील २४ तासांत विदर्भातील उष्णतेची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने उकाड्याची झळ अधिक जाणवणार आहे. कोकणातील अंतर्गत भागांमध्येही रात्रीच्या तापमानात विशेष घट होण्याची शक्यता नसल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज असला तरी विदर्भात वादळी पावसाचे सावट अधिक गडद राहणार आहे. राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नसले तरी वादळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि खवळलेला समुद्र यामुळे मान्सूनपूर्व परिस्थिती अधिक तीव्र होताना दिसत आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस (Weather update)
दरम्यान, यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची प्राथमिक शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. संपूर्ण उन्हाळा विक्रमी उकाड्यात गेल्यानंतर जून महिन्यातही नागरिकांना फारसा दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. उलट जूनमध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
केरळमध्ये कधी हजेरी लावणार? (Weather update)
अंदमान आणि लक्षद्वीपच्या बहुतांश भागांत मान्सूनने हजेरी लावली असून आता केरळमध्ये मोसमी वारे कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील आठवडाभरात केरळमध्ये मान्सून प्रवेशासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे संकेत आहेत. त्यानंतर गोवा, तळकोकण मार्गे मान्सूनचा प्रवास मुंबईकडे होणार असून, त्याआधी कोकण आणि दक्षिण भारतात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.





