दिवाळीपूर्वी स्वस्त कर्जाची शक्यता! रिझर्व बँक आणखी एक धक्कादायक निर्णय घेणार?

मुंबई – दिवाळीसह उत्सवाच्या काळात कर्जपुरवठा वाढावा याकरिता रिझर्व बँक सहा ऑगस्ट रोजी व्याजदरात आणखी 0.25% ची कपात करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पतधोरण समितीच्या चार ते सहा ऑगस्ट दरम्यानच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने या संदर्भात जारी केलेल्या अहवालात ही शक्यता व्यक्त करण्यात आली. या अगोदर कर्ज पुरवठा वाढावा याकरिता दिवाळीअगोदर रिझर्व बँकेने अनेक वेळा 0.25% ची कपात केली असल्याचा दाखला देण्यात आला आहे.
2017 मध्ये अशाच प्रकारे ऑगस्टमध्ये झालेल्या व्याजदर कपातीनंतर दिवाळीपर्यंत 1,956 अब्ज रुपयाचा कर्ज पुरवठा झाला होता. यामध्ये वैयक्तिक कर्जाचे प्रमाण 30% होते. उत्सव सुरू होण्याअगोदर व्याजदर कपात केल्यानंतर त्याचा ग्राहकांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम होतो.
भारतात दिवाळी आणि लगतच्या काळामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असतात. सध्याच्या परिस्थितीत कर्जपुरवठा वाढावा आणि विकासदराला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व बँक प्रयत्न करीत आहे. रिझर्व बँक या संधीचा फायदा घेऊन अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा निर्णय घेऊन पुढाकार घेऊ शकते.
जर रिझर्व बँकेने या संधीचा फायदा घेतला नाही तर रिझर्व बँक केवळ महागाई नियंत्रणावर भर देत आहे असे समजले जाईल. रिझर्व बँकेचे विकासदराकडे दुर्लक्ष होत असल्याचे समजले जाईल असे अहवालात म्हटले आहे. त्याचबरोबर जागतिक आणि अनिश्चित परिस्थितीमुळे निर्यात कमी होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेला अतिरिक्त चालना देण्याची गरज आहे. पत धोरण समिती यावर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा आहे.
महागाई दर कमी पातळीवर
फेब्रुवारीपासून रिझर्व बँकेने व्याजदरात तीन टप्प्यात एक टक्का कपात केली आहे, हे जरी खरे असले तरी महागाईचा दर इतका कमी आहे की पुढाकार घेतल्यास आणखी एक व्याजदर कपात शक्य आहे. रिझर्व बँकेच्या व्याजदर कपातीनंतर व्यावसायिक बँकांना व्याजदर कपात करण्यास उशीर लागतो. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात व्याजदर कपात केली तर त्याचा उत्सव काळात सकारात्मक परिणाम दिसून येणार नाही. यासाठी ऑगस्टमध्येच ही व्याजदर कपात योग्य होईल असे पतधोरण समिती समजू शकते. जर आता व्याजदर कपात केली नाही तर त्याचा कर्जपुरवठयावर झालेला नकारात्मक परिणाम भरून काढण्यास बराच कालावधी लागू शकतो, याची जाणीव पतधोरण समितीला आहे.





