‘मोदी गॅरंटी’ला ‘केजरीवाल गॅरंटी’चं आव्हान; काय आहेत ‘त्या’ १० गॅरंटी पाहा….

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्ली आणि पंजाब या राज्यांत होणाऱ्या मतदानापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मतदारांना दहा गोष्टींची हमी दिली असून त्याची घोषणा आज करण्यात आली आहे. आपल्याला अटक झाल्यामुळे या गॅरंटी जाहीर करण्यास थोडा विलंब झाला असेही त्यांनी म्हटले आहे.
इंडिया आघाडीतील मित्रपक्षांसोबत या दहा गॅरंटींबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र जी हमी आम्ही दिली आहे त्यामुळे कोणाला कोणती अडचण भासणार नाही असा दावा केजरीवाल यांनी केला.
या गॅरंटींवर युध्दपातळीवर काम केले जाईल आणि लोकांनीच आता ठरवायचे आहे की त्यांना केजरीवालांची गॅरंटी हवी आहे की नरेंद्र मोदी यांची, अशी टिप्पणीही केजरीवाल यांनी केली.
अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या दहा हमी अर्थात गॅरंटी
१. देशभरात २४ तास मोफत वीज
२. चांगले आणि मोफत शिक्षण
३. चांगल्या आरोग्याची हमी. प्रत्येक गाव आणि मोहल्ल्यात क्लिनिक उघडणार
४. देश सगळ्यांत महत्वाचा. चीनने बळकावलेली जमीन परत मिळवणार आणि लष्कराला मोकळीक देणार
५. अग्निवीर योजना बंद करणार आणि हंगामी नोकऱ्याही बंद करणार
६. शेतकऱ्यांना एमएसपीची हमी
७. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार
८. वर्षाला दोन कोटी रोजगारांची तजवीज करणार
९. भाजपचे वॉशिंग मशिन भर चौकात तोडणार. भ्रष्टाचारापासून मुक्तता देणार
१०. जीएसटी सुलभ करणार. पीएमएलएच्या बाहेर करणार. चीनच्या पुढे जाणे हे आमचे लक्ष्य आहे.





