Chakan Road Accident: चाकण एमआयडीसीत निष्पाप कामगारांचे बळी! ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Chakan Road Accident: चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातात मृत कामगारांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी.

Chakan Road Accident – चाकण औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातात प्राण गमावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना शासनाने विशेष आर्थिक मदत द्यावी. तसेच अपूर्ण कामे ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याचा परवाना रद्द करावा, अशी मागणी स्वराज्य पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
स्वराज्य पक्षाचे प्रदेश सदस्य सोमनाथ ढोले यांनी चाकण दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते व इतर नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आले होते. या पाहणीप्रसंगी खासदार अमोल कोल्हे, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार बाबाजी काळे तसेच प्रशासकीय विभागांचे प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
एमआयडीसी परिसरातील सर्व रस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करून खड्डे बुजवावेत, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, पथदिवे, दिशादर्शक फलक आणि पाणी निचरा व्यवस्था उभारावी, असा आग्रह याप्रसंगी धरण्यात आला. या मागनीचे निवेदन सादर करताना सोमनाथ ढोले यांच्यासोबत ओंकार बडगीर, साईराज फलके, गणेश गवळी, प्रवीण भोसले व संकेत सोनावणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खड्ड्यांमुळे कामगारांचे नाहक बळी
देश-विदेशातील नामांकित कंपन्या असलेल्या चाकण औद्योगिक क्षेत्रात दररोज हजारो कामगार व नागरिक ये-जा करतात. मात्र, मुख्य व अंतर्गत रस्त्यांची झालेली चाळण, साचणारे पाणी, चिखल आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक घरांचे प्रमुख कमावते सदस्य असणाऱ्या कामगारांना या अपघातांत जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मृत कामगारांची यादी तयार करून त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत तसेच मुलांच्या शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कामात निष्काळजीपणा; ठेकेदारावर गुन्हा दाखल करा!
पुणे-नाशिक आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गांची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात घडत असून, दोषी ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याचा परवाना रद्द करावा, अशी मागनी स्वराज्य पक्षाच्या वतीने करण्यात आली.






