प्रभात वृत्तसेवा चाकण – ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी निवडणुकीत जिवाचे रान केले, त्या सर्वांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. पराभव झाला असला तरी खचणार नाही. नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चाकणचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार केला असल्याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.आगामी चाकण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चाकण शहरात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते व तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार दिलीप मोहिते, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, तालुका महिला अध्यक्षा संध्या जाधव, खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कमल कड, चाकण शहराध्यक्ष राम गोरे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष मुबीन काझी, नगरसेवक धीरज मुटके, साहेबराव कड, विशाल नायकवाडी, प्रकाश भुजबळ, गुलाब शेवकरी, योगेश देशमुख, सुयोग शेवकरी, किरण पठारे, बाबा कौटकर, सुदाम शेवकरी, विजया तोडकर, निलोफर शेख, अमोल घोगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, माझ्या कार्यकाळात चाकण, राजगुरूनगर आणि आळंदी शहरांसाठी पाणीपुरवठा योजना, उपजिल्हा रुग्णालय आणि रस्ते या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. पुढील काळात चाकणमधील वाहतूक कोंडी, उपनगरातील रस्ते, नवीन प्रशासकीय इमारत, नागरिकांसाठी खेळाचे मैदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘नाना-नानी पार्क’, ओपन जिम यांसारख्या सुविधा निर्माण करण्याचा संकल्प आहे. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, समाजातील सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन निवडणुका जिंका. गरीब पण निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्षातून संधी मिळाली पाहिजे. ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ या उपक्रमांतर्गत नगरसेवक आणि पदाधिकार्यांनी दररोज आपल्या प्रभागातील नागरिकांच्या भेटी घ्याव्यात, चहापान कार्यक्रमातून त्यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. बैठकीचे प्रास्ताविक राम गोरे यांनी केले, तर प्रभावी सूत्रसंचालन मुबीन काझी यांनी केले.