Pune district : भोंगवली-कामथडी गटात खुर्चीचा ‘खेळ’

कापूरहोळ : भोर तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोमवार, दि. १३ रोजी जाहीर होताच गेली अनेक दिवस आरक्षणासाठी थांबलेले उमेदवार लागलीच कामाला लागले आहेत. भोर तालुक्यात सर्वात राजकीय आखाडा म्हणून लक्ष लागलेला हा गट राजकीय असतीत्वासाठी केंदीत असून आजी माजी सदस्य उमेदवार यावेळी आपले नशीब अजमावणार आहेत. भावी उमेदवारांनी गटात गावोगावी बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. समर्थकांच्या गाठी भेटी घेऊन प्रचाराची दिशा ठरविण्यासाठी आणि आपली ताकद अजमावण्यात दंग आहे.
सत्तेच्या तीन पक्षांमध्येच नव्हे तर त्या त्या पक्षांतर्गत गटांमध्ये कोण बाजी मारणार यावरून चुरस सरू झाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये माजी सदस्य चंद्रकांत बाठे आणि विकम खुटवड यांच्यात चढाओढ सुरू आहे. राजकीय डावपेचात विक्रम खुटवड यांचे बालेकिल्ल्याची मताधिक्याची काही गावे या गटातून वगळल्यामुळे त्यांना भोंगवली-कामथडी गटातून उमेदवारी मिळणार का याच्यासाठी त्यांचे कार्यकर्ते व खुटवड प्रयन्नशील आहेत.
यदा कदाचीत या दोघपैकी एकाला पक्षाने तिकीट दिल्यास दुसरा इतर पक्षात पक्ष प्रवेश करून लढणार का ? या चर्चेला उधाण आले आहे. या दोघांचे समर्थक आपल्या नेत्याची बाजू वरचढ अमल्याचे दाखवत आहेत. तर काँग्रेस आय सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले महेश टापरे यांनी गाव पातळीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांचा जुना गट विभागल्यामुळे मताधिक्याचा अर्धा गट हा वेळू नसरापूरमध्ये आहे.
मात्र, वेळू नसरापूर गट इतर मार्गास प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे कुलदीप कोंडे भोंगवली-कामथडी गटातून उभे रहाणार का हा प्रश्न आहे. अद्याप तरी भोंगवली कामथडी गटातून कोंडे सोडून इतर नाव चर्चेत नाही. तर मागील निवडणुकीत पराभूत झालेले चंदूभैय्या परदेशी हे इतर मार्गास प्रवर्गातून पुन्हा वेळू नसरापूर गटातून निवडणूक लढणार का, त्यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे.
गेली दोन दशके पत्रकार क्षेत्रात नावाजलेले वैभव धाडवे पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर केलीआहे.
ते कोणत्या पक्षातून लढणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. गेली दोन दशके समाजाशी त्यांची सखोल नाळ जोडली असून तरूण युवक त्यांच्या पाठीशी आहे. सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्रीडा क्षेत्रांशी निगडीत असलेले नेतृत्व म्हणून त्यांचेकडे समाज पाहत आहे. या गटातील तरूणांची बेरोजगारी,नागरी सुविधा, तसेच परिसरातील औद्योगिक कारखान्यातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेवून गटात रोजगार निर्मिती, रस्ते पाणी, लाईट या मुलभूत समस्यांबाबत कायम आवाज उठविला आहे. त्यामुळे या भागातील तरुण त्याच्या पाठिशी ठाम उभा आहे.
यंग ब्रिगेड मैदानात उतरणार
वरिष्ठ पातळीवरील सर्व पक्षाच्या राजकीय कुरघोड्याला आणि आवो जावो घर तुम्हारा त्यामुळे पक्षाच्या विचाराची पायमल्ली झाली आहे. पक्षीय राजकारणावर नागरिकांचा विश्वास राहीला नसून गेली काही दशके तेच ते चेहरे तीच तीच घराणी, जाती पातीचे आणि त्यांचे भोवतालचे चांडाळचौकडीचे राजकारण याला जनता कंटाळली आहे. त्यामुळे होवू घातलेली निवडणूक व्यक्ती विचारांच्या प्रभावावरच ठरणार आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी तरूण युवकांनी कंबर कसली आहे. त्यामुळे राजकारणात तरुण नेते कोण पुढे येणार, हे येणारा काळच ठरवेल.





