Rahul Gandhi : 1 नोव्हेंबरच्या रॅलीवरून व्यापाऱ्यांची चिंता; राहुल गांधी म्हणाले, ‘…तर 30 सेकंदात आंदोलन थांबेल’
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिल्लीतील व्यापाऱ्यांना संदेश देत 1 नोव्हेंबरच्या रॅलीबाबत भूमिका मांडली. ज्ञानेश कुमार यांना हटविण्याची मागणी आणि SIR, मतचोरीचा मुद्दा चर्चेत.

Rahul Gandhi : दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबरला होणाऱ्या प्रस्तावित ‘चलो दिल्ली’ रॅलीवरून व्यापारी संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. रॅलीमुळे दिवाळीपूर्वीच्या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ती १० नोव्हेंबरनंतर घेण्यात यावी, अशी मागणी चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने (सीटीआय) राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी दिल्लीतील व्यापाऱ्यांना उद्देशून ‘एक्स’वर संदेश प्रसिद्ध केला. व्यापाऱ्यांच्या अडचणी आपण ऐकत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच ‘मतचोरी’चा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटविण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. ज्ञानेश कुमार यांना हटविल्यास आंदोलन ३० सेकंदांत थांबेल, असा दावा त्यांनी केला.
रॅलीमुळे सुरक्षा व्यवस्था, वाहतूक बदल आणि रस्त्यांवरील निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांदणी चौक, सदर बाजार, खारी बावली आणि भागीरथ पॅलेस यांसारख्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची ये-जा कमी होऊ शकते, अशी व्यापाऱ्यांची चिंता आहे.
काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा (एसआयआर) आणि कथित ‘मतचोरी’चा मुद्दा उपस्थित केला आहे. या प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या संदेशात ज्ञानेश कुमार यांचा उल्लेख ‘आरोपी क्रमांक ४’ असा केला आहे.





