Duleep Trophy 2025 : मालेवार-पाटीदार जोडीचा शतकी धमाका! सेंट्रल झोनची पहिल्या दिवशी मजबूत पकड

Duleep Trophy Quarterfinals 2025 Updates : दुलीप ट्रॉफी २०२५ ची सुरुवात आजपासून झाली असून, सेंट्रल झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्याचा पहिला दिवस बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलन्स ग्राउंड बीवर खेळला गेला. पहिल्या दिवसअखेर सेंट्रल झोनने ७७ षटकांत २ बाद ४३२ धावा केल्या. दानिश मालेवारने नाबाद १९८ धावांची खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले, तर कर्णधार रजत पाटीदारने शतकी खेळी केली.
सेंट्रल झोनने टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला सुरुवात केली, पण अवघ्या ४ धावांवर आयुष पांडे (३) बाद झाला. यानंतर आर्यन जुयाल आणि दानिश मालेवार यांनी डाव सावरला. आर्यनने १०० चेंडूत ८ चौकारांसह ६० धावा केल्या आणि नंतर रिटायर्ड हर्ट झाला. यानंतर कर्णधार रजत पाटीदारने मैदानावर पाऊल ठेवले आणि ९६ चेंडूत २१ चौकार आणि ३ षटकारांसह १२५ धावांची खेळी केली. त्याने अवघ्या ८० चेंडूत शतक पूर्ण केले. पाटीदार बाद झाला तेव्हा संघाने २ बाद ३४७ धावा केल्या होत्या.
दानिश मालेवार आणि यश राठोड नाबाद –
सेंट्रल ज़ोन के कप्तान रजत पाटीदार ने 125 (96) और दानिश मलेवार ने 198* (219) रनों की शानदार पारी खेली 💪🔥#DuleepTrophy #RajatPatidar #DanishMalewar #Cricket #CentralZone pic.twitter.com/m3XUA7IwhQ
— Vinod Cricinfo (@vinod_cricinfo) August 28, 2025
यानंतर दानिश आणि यश राठोड यांनी ८५ धावांची अटूट भागीदारी करत संघाला ४०० धावांच्या पलीकडे नेले. पहिल्या दिवसअखेर दानिश मालेवारने २१९ चेंडूत ३५ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १९८ धावा केल्या, तर यश राठोड ३२ धावांवर नाबाद आहे. नॉर्थ ईस्ट झोनकडून आकाश चौधरीने १७ षटकांत ७३ धावा देत १ विकेट्स घेतली, तर फेइरोइजाम जोतिनने १४ षटकांत ५६ धावा देत १ विकेट्स घेतली.
दानिश मालेवारचा वैयक्तिक विक्रम –
दानिश मालेवारने या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपला सर्वोत्तम स्कोअर नोंदवला. यापूर्वी त्याने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात १५३ धावांची खेळी केली होती, ज्यामुळे त्याला दुलीप ट्रॉफीसाठी सेंट्रल झोनच्या संघात स्थान मिळाले. या हंगामात दानिशने ९ सामन्यांतील १५ डावांत ५२.२० च्या सरासरीने ७८३ धावा केल्या, ज्यात २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यंदाच्या हंगामात ९५ चौकार आणि ६ षटकार ठोकले आहेत. सेंट्रल झोनच्या या दमदार सुरुवातीनंतर उद्याच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





