केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही ः पवार

बोधेगाव – गहू व साखर या दोन पिकांचे मागणीपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. या दोन्ही पिकांना निर्यात बंदी केली आहे. ही निर्यातबंदी उठविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. साखर कारखानदारांनी डिस्टलरी प्रकल्प काढल्याने ऊसाला टनाला 100 रूपये जादा भाव देण्याची ताकद निर्माण होणार आहे, तसेच सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे, ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली, सरकारचे धोरण हे देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे संघर्षयोध्दा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सुमननगर नियोजित 30 केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी/ इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन व बबनराव ढाकणे यांच्या सामाजिक व राजकिय जीवनाकार्यावर आधारीत “महाराष्ट्र विधानमंडळातील बबनराव ढाकणे’ या संपादीत ग्रंथाचा प्रकाशन समारंभ पवार यांच्या हस्ते झाले.
यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बबनराव ढाकणे, आमदार नीलेश लंके, आमदार संग्राम जगताप, बुलढाणा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रतापराव ढाकणे, ऋषिकेश ढाकणे, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, दादाभाऊ कळमकर, शिवशंकर राजळे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, माजी मुख अभियंता सी. डी. फकीर, डॉ. संजय उदमले, व्यंकटेश मल्टिस्टेटचे अध्यक्ष अभिनाथ शिंदे, युवा नेते व्यंकट देशमुख यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की, कोणत्या कारखान्यातील यशाचे श्रेय जसे मालकाला आहे. त्याहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांनाही आहे. सहकार चळवळीचा वारसा आहे. सर्वाधिक कारखाने या जिल्ह्यात असून यापुढे साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीकडे वळावे. असाही सल्ला साखर कारखान्यांना दिला.
दरम्यान, यावेळी केंद्रीय रस्ते, परिवहन, वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दृकश्राव्य संदेशांच्या माध्यमातून म्हणाले की, साखर धंद्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. आपली गरज 260 लाख टन आहे.उत्पादन 360 लाख टन आहे. 40 हजार कोटींची साखर निर्यात करूनही साखर शिल्लक आहे. तेव्हा जास्तीचे साखर उत्पादन न घेता इथेनॉल निर्मिती कडे वळले पाहिजे. देशात फ्लेक्स इंजिनवर चालणारी वाहने निर्मितीस सुरूवात झाली आहे. भविष्यात पेट्रोल ऐवजी 100 टक्के बायोइथेनॉल वापर होणार आहे. तेव्हा कारखान्यांच्या फायद्यासाठी इथेनॉल निर्मिती करा. यावेळी माजीमंत्री बबनराव ढाकणे, ऍड. प्रतापराव ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे यांनीही मनोगत व्यक्त केले.
हार पचवायला ताकद लागते ः बबनराव ढाकणे
<सामाजिक आणि राजकीय जीवनामुळे आपले आपल्या कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. मी माझ्या मुलांना देखील भेटू शकत नव्हतो, आज प्रताप राजकीय व सामाजिक जीवनात संघर्ष करत आहे. याचा मला अभिमान आहे. आणि हार पचवायला ताकद लागते असे म्हणत माजी केंद्रीय मंत्री व विधान सभेचे माजी उपाध्यक्ष बबनराव ढाकणे यांनी त्यांचे पुत्र प्रतापराव ढाकणे यांचे व्यासपीठावर सत्कार करून आलिंगन घेतले तेव्हा दोन्ही पिता-पुत्राच्या डोळे पाणावले होते.





