Nagar | केंद्र व राज्य सरकार आदिवासी व बहुजन विरोधी- आमदार थोरात

संगमनेर, (प्रतिनिधी)- देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिला बसावी, हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्वप्न होते. याकरिता काँग्रेसने वंचित बहुजन आदिवासींच्या विकासासाठी कायम काम केले.
मात्र मणिपूरमधील आदिवासी महिलांवर अत्याचार, राम मंदिर व नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती महोदयांना न बोलवणे या विचारांचे लोक सत्तेवर आहे.
सध्याचे केंद्र व राज्य सरकार ही आदिवासी गरीब आणि बहुजन यांच्या विकासाच्या विरोधी असल्याची टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. आदिवासी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहा,असे आवाहन त्यांनी केले.
कोळवाडे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती व जयहिंद आदिवासी आश्रम शाळेच्या 30 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मा. आ. डॉ.सुधीर तांबे होते. व्यासपीठावर दुर्गाताई तांबे, ॲड.माधवराव कानवडे, डॉ. जयश्री थोरात, आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव, बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख आदींसह परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते.
लकी जाधव म्हणाले की, आदिवासींच्या विकासाच्या योजनेचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी वापरला जात आहे. हे सरकार आपले सर्व अधिकार काढून घेत असून सर्वांनी येत्या काळात महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन केले.
डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, आदिवासी हे मूळ देशाचे मालक आहे. स्त्रियांना मान देणारा, पर्यावरणाचा रक्षण करणारा, जीवनात जगण्यासाठी रोज संघर्ष करणारा आदिवासी बांधव असून हे सर्व प्रामाणिक व कष्टकरी असतात.
यावेळी संपतराव कडू ,नवले मामा, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, दशरथ गायकवाड, श्रीराम कुऱ्हे, मधुकर गोंदे, श्रीपत कुदळ, लहानु काळे, दत्तू तारडे ,रामा मडके, राजू कवटे ,
डॉ.संतोष खेडलेकर, दिलीप बांबळे, अण्णा रहिंज, बाळकृष्ण गांडाळ, संदीप गोपाळे आदींसह परिसरातील कार्यकर्ते व आदिवासी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या




