Sangamner News : संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार परिसरात तमाशा मंडळातील कलाकारांना बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा मंडळातील पुरुष आणि महिला कलाकारांना लक्ष्य करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून हा वाद उफाळला. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी इतरांना बोलावून घेत कलाकारांवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या मारहाणीत अनेक कलाकार जखमी झाले असून महिलांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. काही महिलांचे कपडे फाडल्याचाही आरोप आहे. या घटनेत महेश नारायणगावकर यांनाही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.