सिमेंटच्या किमती वाढणार ; एप्रिलमध्ये 50 रुपयांची वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली – एप्रिल महिन्यात सिमेंटचे दर प्रति बॅगेला 25 ते 50 रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे. सिमेंटसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे काही कंपन्यांनी अगोदरच दरवाढ केली आहे. इतर कंपन्या लवकरच दरवाढ करण्याची शक्यता असल्याचे क्रीसिल या आर्थिक विश्लेषण करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे.
रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर इतर वस्तूबरोबरच सिमेंटसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरातही वाढ होत आहे. या अगोदर गेल्या 12 महिन्यात सिमेंटच्या किमती वाढून साधारणपणे 390 रुपये प्रती बॅग झाल्या आहेत. आता त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाचे दर साधारणपणे 115 डॉलर प्रति पिंप आहेत. याचा सर्वच वस्तूच्या किमतीवर परिणाम होत आहे. जागतिक पातळीवर कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे.देशांतर्गत गरज भागविण्यासाठी इंडोनेशियाने कोळशाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हवामान बदलामुळे काही खाणीतील कोळशाचे उत्पादन बंद झाले आहे. यामुळे सिमेंट कंपन्यांना मिळणाऱ्या कोळशाच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर डिझेलच्या किमती वाढल्यामुळे सिमेंटचा रस्त्यावरील वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे.
मोठ्या प्रमाणात डिझेलची खरेदी करणाऱ्यासाठी डिझेलचा दर प्रति लिटरला 25 रुपयांनी वाढविण्यात आला आहे. पेट्रोल पंपावरील डिझेलचा दर दहा रुपयांनी वाढविण्यात आला आहे. सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्राला दिलेली चालना, त्याचबरोबर कमी किमतीच्या घरांची वाढत असलेली विक्री पाहता 2023 मध्ये सिमेंटची विक्री पाच ते सात टक्क्यांनी वाढेल असे या संस्थेला वाटते. भारतामध्ये सिमेंटचे जे उत्पादन होते त्यापैकी 60 टक्के सिमेंट घराच्या बांधकामासाठी वापरले जाते.





