Pune : मार्च, एप्रिल ठरतोय आगीचा महिना…

पुणे : शहरात गेल्या काही वर्षांत मार्च आणि एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४० च्या वर गेला आहे. त्यामुळे शहरात मागील तीन वर्षांपासून मार्च आणि एप्रिल महिन्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली असल्याचे समोर आले आहे. मागील दोन वर्षांत हे प्रमाण वाढले असून, त्यात सर्वाधिक शाॅर्टसर्किट आणि गवत तसेच कचऱ्याला आग लागण्याचा घटनांचा सर्वाधिक समावेश आहे.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे लागलेल्या आगीच्या काॅलच्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या पूर्वी शहरात कडक उन्हाळा मे महिन्यात असल्याने मे महिन्यात सर्वाधिक आगीच्या घटना घडत होत्या. मात्र, आता मार्च महिन्यापासूनच या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.
शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. परिणामी, शहराचे तापमानही वाढत असल्याचे चित्र असून, या वर्षी जानेवारीपासूनच शहरात उन्हाचा चटका सुरू झाला असून, तापमानाचा पारा चढा राहिलेला आहे. तर मार्चअखेरीस शहरातील तापमान ३८-३९ च्या आसपास राहिल्यानंतर एप्रिल महिन्यात शहराच्या काही भागात तापमान थेट ४३ पर्यंत गेले आहे.
त्यामुळे गवताला तसेच कचऱ्याला आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच उकाडा वाढल्याने शहरात विजेची मागणी भरमसाठ वाढल्याने या महिन्यांमध्ये शार्टसर्किटचे प्रमाणही वाढलेले असून, शहरात २०२५ मध्ये जानेवारीत ३१, फेब्रुवारीमध्ये ४१ तर मार्च महिन्यात ६१ घटना घडल्या असून, २० एप्रिलपर्यंत या घटना ७० च्या वर गेल्या आहेत.
तर गवताला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे महावितरणचे फिडर तसेच वीजवाहक तारांचे वारंवार नुकसान होत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून, अनेकदा चक्राकार भार नियमन करण्याची वेळ महावितरणवर ओढावली आहे.
काय सांगते आकडेवारी
२०२३
जानेवारी – ५०२
फेब्रुवारी – ५२२
मार्च – ४८२
एप्रिल – ५७५
२०२४
जानेवारी – ४२५
फेब्रुवारी- ४७९
मार्च- ५६८
एप्रिल – ६३२
२०२५
जानेवारी – ५५५
फेब्रुवारी- ६४०
मार्च- ७७६
२० एप्रिल अखेर – ५८५





