Pune District : राजुरीत प्राचीन संस्कृतीचा जागर; गुहेत विराजमान विघ्नहर्ता
Pune District : प्राचीन संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या या देखाव्यात गुहेचे प्रवेशद्वार, आतील रचना तसेच प्राचीन काळातील वातावरणाची अनुभूती देणारी सजावट करण्यात आली आहे.

बेल्हे : गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर कला, संस्कृती आणि सामाजिक एकोपा जपण्याचे माध्यम आहे, हे राजुरी येथील समता गणेश मंडळाने साकारलेल्या आकर्षक देखाव्यातून अधोरेखित केले आहे. गणेशोत्सवानिमित्त मंडळाने प्राचीन काळातील गुहेची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून, या गुहेत विघ्नहर्ता श्री गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. या कलात्मक देखाव्यामुळे परिसरातील गणेशभक्तांचे लक्ष वेधले जात आहे.
प्राचीन संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या या देखाव्यात गुहेचे प्रवेशद्वार, आतील रचना तसेच प्राचीन काळातील वातावरणाची अनुभूती देणारी सजावट करण्यात आली आहे. पारंपरिक धार्मिक श्रद्धेला कलात्मक निर्मितीची जोड देत मंडळाने गणेशभक्तांसमोर प्राचीन संस्कृतीचा जागर करण्याचा प्रयत्न केला आहे.
समता गणेश मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सवात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांनी एकत्र यावे, सामाजिक बांधिलकी जपावी आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची नव्या पिढीला ओळख करून द्यावी, या उद्देशाने मंडळाकडून उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
प्राचीन गुहेची प्रतिकृती साकारताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि कलात्मक दृष्टी यामुळे देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. गणरायाच्या दर्शनासोबतच प्राचीन संस्कृतीची माहिती आणि तिच्या वैभवाची अनुभूती नागरिकांना मिळत आहे.





