संयुक्त राष्ट्रांच्या आदेशामुळे दोन्ही देशांत संघर्षविराम झाला; भाजपच्या ‘या’ आमदाराचे मोठे वक्तव्य

भोपाळ : भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर अजब-गजब वक्तव्ये करण्याची जणू मध्यप्रदेशातील भाजप नेत्यांमध्ये स्पर्धाच सुरू झाली आहे. आता त्या राज्यातील आमदार नरेंद्र प्रजापती यांनी वेगळाच शोध लावला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आदेशामुळे दोन्ही देशांत संघर्षविराम झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मध्यप्रदेशच्या रीवामध्ये शनिवारी भाजपने तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रजापती बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान विरोधात मोहीम हाती घेण्यात आली. संघर्षविराम करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचा आदेश आला नसता; तर पाकिस्तान संपला असता, असे ते म्हणाले. प्रजापती यांच्या भाषणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे वादंग निर्माण होण्याची जाणीव झाल्यावर त्यांनी नंतर सारवासारव केली. नरमलेल्या पाकिस्तानने विनवणी केल्यानंतर मोदी आणि भारतीय सशस्त्र दलांनी संघर्षविराम जाहीर केला.
माझ्या आधीच्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला, असा आरोपही त्यांनी केला. याआधी मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा आणि त्या राज्याचे मंत्री विजय शहा यांनी केलेली वक्तव्ये वादग्रस्त ठरली. आपल्या नेत्यांकडून केली जाणारी काही-बाही वक्तव्ये भाजपसाठी मात्र डोकेदुखीचा विषय ठरत आहेत.





