CBSE Board – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीसाठी लागू केलेल्या ‘टू बोर्ड परीक्षा’ धोरणांतर्गत शाळांना कडक नियमावली लागू केली आहे. गुण सुधारण्यासाठी (इम्प्रूव्हमेंट) मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या अतिरिक्त परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे अवांतर शिक्षणशुल्क आकारू नये, अशा सूचना मंडळाने शाळांना दिल्या आहेत. ज्या शैक्षणिक संस्था बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करतील, त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशाराही मंडळाने दिला आहे. सीबीएसईने यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण सुधारण्यासाठी मे महिन्यात दुसरी बोर्ड परीक्षा आयोजित केली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजेच अंतिम यादी सादर करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया तीन टप्प्यांत विभागलेली असून, पहिल्या टप्प्यात केवळ संभाव्य विद्यार्थ्यांची नोंदणी करायची आहे. या टप्प्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यास मनाई केली आहे. पुढील टप्प्यांमध्ये विषयांची निवड किंवा बदल करताना केवळ नियमानुसार अधिकृत परीक्षा शुल्क घेणे अपेक्षित आहे. अनेक शाळा या प्रक्रियेचा गैरफायदा घेत विद्यार्थ्यांकडून चक्क तीन महिन्यांचे आगाऊ शिकवणी शुल्क वसूल करत असल्याच्या तक्रारी मंडळाकडे आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत सीबीएसईने ही कृती पूर्णपणे नियमबाह्य असल्याचे जाहीर केले आहे. मंडळाने स्पष्ट केले आहे की, नोंदणीच्या नावाखाली अवांतर किंवा अनधिकृत शुल्क घेणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल. अशा तक्रारीमुळे संबंधित शाळांची मान्यता धोक्यात येऊ शकते. जर एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षा शुल्क भरल्यानंतर आपला निर्णय बदलला आणि तो मे महिन्यातील परीक्षेला बसला नाही, तरी त्याचे नुकसान होणार नाही. अशा विद्यार्थ्याचा निकाल त्याच्या मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारेच जाहीर केला जाईल. सीबीएसईच्या या निर्णयामुळे पालकांवरील आर्थिक ताण कमी होणार असून, केवळ गुणांच्या प्रगतीसाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.