SSC HSC Supplementary Exam दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला परीक्षेला सुरुवात; पाहा
SSC HSC Supplementary Exam : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवण्यासाठी मंडळाची तत्परता; १५ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे बोर्डाचे संकेत.

SSC HSC Supplementary Exam – महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या १६ जूनपासून या पुरवणी परीक्षा सुरू होणार आहेत. दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणार आहे. दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच सोशल मीडिया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास राज्य मंडळ जबाबदार राहणार नाही, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १६ जून ते ८ जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा १६ जून ते ३० जून या कालावधीत होणार असून प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षाही याच कालावधीत होणार आहेत. पुरवणी परीक्षांचेही निकाल १५ जुलै पर्यंत जाहीर करण्याचे मंडळाचे प्रयत्न आहेत, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.





