Latur CBI raid : लातूरमध्ये सीबीआयची पुन्हा झाडाझती; ट्युशन संचालकाच्या कार्यालयावर छापे
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात लातूर कनेक्शन अधिक गडद होत असून, सीबीआयने आज शहरातील हालचाली पुन्हा वाढवल्या आहेत.

Latur CBI raid : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात लातूर कनेक्शन अधिक गडद होत असून, सीबीआयने आज शहरातील हालचाली पुन्हा वाढवल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी लातूरमध्ये कारवाईला सुरुवात झाली होती.
त्यानंतर दिवसभर सुतमील परिसरातील एका खासगी ट्युशन चालकाच्या घरी तब्बल अकरा तास तपासणी केल्यानंतर आता आज दुपारपासून त्याच ट्युशन संचालकाच्या कार्यालयावरही सीबीआयचे पथक तपास करत आहे.
सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक घेतल्यानंतर ही कारवाई अधिक महत्त्वाची मानली जात आहे. शुक्रवारी पहाटेपासून सीबीआयचे अधिकारी संबंधित ट्युशन चालकाच्या निवासस्थानी दाखल झाले होते.
घरातील कागदपत्रे, मोबाईल, संगणक तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदींची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर पथकाने ट्युशन चालणाऱ्या ठिकाणी जाऊनही विविध माहिती आणि नोंदी गोळा केल्याची माहिती समोर आली होती.
आज दुपारपासून पुन्हा सीबीआयचे एक पथक त्या ट्युशनच्या कार्यालयात तपास करत असून, या संपूर्ण कारवाईबाबत मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात येत आहे.
नांदेड आणि लातूर पोलिसांचा बंदोबस्त तसेच सीबीआयचे अधिकारी या तपासात सहभागी असल्याची माहिती आहे. संबंधित ट्युशनचालक लातूरमध्ये आहे का नाही याबाबत कोणतीही माहिती समोर येताना दिसत नाही.





