दखल : घातक स्किन ब्राइटनिंग क्रीम्स
बंदी असूनही विषारी धातूंनी भरलेली पाकिस्तानी स्किन ब्राइटनिंग नाइट क्रीम (Skin Brightening Creams) भारतात उपलब्ध कशी? या क्रीम्सबाबतच्या सर्व महत्त्वाच्या पैलूंवर एक नजर टाकूया.

– नित्तेंन गोखले
Skin Brightening Creams : बंदी असूनही विषारी धातूंनी भरलेली पाकिस्तानी स्किन ब्राइटनिंग नाइट क्रीम (Skin Brightening Creams) भारतात उपलब्ध कशी? या क्रीम्सबाबतच्या सर्व महत्त्वाच्या पैलूंवर एक नजर टाकूया.
जून 2026 दरम्यान, पुण्यात राहणारा 25 वर्षीय तरुण प्रथमेश फडतरे त्याच्या गंभीर आजारामुळे चर्चेत आला. प्रथमेशला स्नायू दुखणे, पाठदुखी, सतत घाम येणे, थंडी वाजणे आणि पायांवर सूज येणे अशी लक्षणे दिसू लागली. अनेक चाचण्यांनंतर पुण्यातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला फेअरनेस क्रीममुळे (Skin Brightening Creams) मर्क्युरी पॉयझनिंग (पारा विषबाधा) झाल्याचे स्पष्ट केले.
प्रथमेशच्या डॉक्टरांनी गेल्या काही वर्षांत अशा अनेक केसेस भारताच्या विविध शहरांत पाहिल्याचे सांगितले. पण क्रीम्समध्ये पार्याचे प्रमाण इतके जास्त का असते? या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्यायचे झाले तर, त्वचा लवकर गोरी करण्याचा हा सर्वात स्वस्त मार्ग आहे. पारा, शिसे आणि इतर जड धातू त्वचेतील मेलॅनिनची निर्मिती रोखतात. याने त्वचा उजळ दिसते.
साधारण दहा-पंधरा दिवसांत दिसू लागणार्या या गोरेपणामुळे ग्राहक ही क्रीम महिनोन्महिने वापरत राहतात. वास्तविक पाहता, क्रीममध्ये असलेले विषारी घटक निरोगी ऊती नष्ट करतात आणि त्वचेला गंभीर नुकसान पोहोचवतात.
शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून हेही समोर आले आहे की, हे जड धातू त्वचेद्वारे रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि अखेरीस मूत्रपिंडांपर्यंत (किडनीपर्यंत) पोहोचतात. याचे दुष्परिणाम वापरकर्त्याचे वय, एकूण आरोग्यस्थिती आणि विषारी क्रीम किती दिवस वापरली गेली आहे, यावर अवलंबून असतात.
स्पष्ट सांगायचे झाले तर, फेअरनेस क्रीम्स (Skin Brightening Creams) अगदी आयुर्वेदिकसुद्धा, त्वचेचा नैसर्गिक रंग कायमस्वरूपी बदलू शकत नाहीत. रसायने नसलेली शुद्ध आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेली क्रीम्स त्वचेवर असलेले किरकोळ काळे डाग कमी करण्यास मदत करू शकतात; परंतु लोकांची दिशाभूल करून त्यांना विष विकले जाते.
एमएफडीए, अर्थात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने या विषयात लक्ष घालून जून आणि जुलै महिन्यात मोठी कारवाई केली. सरकारी यंत्रणेने पारा आणि शिसे यांचे प्रमाण जास्त असलेल्या चार ‘फेअरनेस क्रीम्स’बाबत इशारा दिला आहे. यातील ‘गोरी ब्यूटी क्रीम’ तर पाकिस्तानी बनावटीची आहे. साधारण 2024 पासूनच त्यावर बंदी असूनदेखील ती बेकायदेशीरपणे भारतात आयात केली जाते.
या क्रीम्समुळे मज्जासंस्था आणि मूत्रपिंडांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नमूद केलेल्या चार क्रीम्सची साठवणूक किंवा विक्री करू नये, अशी सूचना एफडीएने सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रेत्यांना दिली आहे. तथापि, अन्न व औषध नियामक प्राधिकरणाकडून देण्यात आलेला हा पहिलाच इशारा नाही.
यापूर्वी, नोव्हेंबर 2024 मध्ये एफडीएचे तत्कालीन सह-आयुक्त गिरीश हुकारे यांनीही असाच इशारा दिला होता. महाराष्ट्र एफडीएने पुण्यात ब्यूटी पार्लर्ससह अनेक ठिकाणी छापे मारून पाकिस्तानात तयार होणार्या ‘गोरी’ या त्वचा उजळवणार्या क्रीम व साबणांचा मोठा साठा जप्त केला होता. एफडीए तसेच खासगी प्रयोगशाळांतील चाचण्यांमध्ये यात शिसे, पारा आणि स्टिरॉइड्सचे प्रमाण मर्यादेपेक्षा 20 पट अधिक असल्याचे निष्पन्न झाले.
या क्रीम्सचा महिनाभर वापर केल्यास मज्जासंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि आरोग्याला जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो, असे एफडीएने आपल्या 2024 मधील एका प्रसिद्धीपत्रकात स्पष्टपणे नमूद केले होते. यासंदर्भात बातम्या देखील अनेकदा प्रसिद्ध झाल्या. पण एवढे सगळे होऊनदेखील ग्राहक या क्रीम्स का विकत घेतात? या प्रश्नाची अनेक उत्तरे आहेत.
कंपन्या चालवत असलेल्या इन्स्टाग्राम मोहिमा (इन्स्टाग्राम मार्केटिंग कॅम्पेन्स) हा त्यातील एक महत्त्वाचा पैलू आहे. एफडीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अहवालात क्रीम्सची (Skin Brightening Creams) नावे नमूद केली आहेत. त्यातील चारांपैकी दोन क्रीम्स व साबण भारतात, कर्नाटकात बनतात आणि इतर दोन पाकिस्तानातून येतात. सर्व विषारी क्रीम उत्पादक आणि विक्रेते इन्स्टाग्रामवर मोहिमा चालवतात.
त्यांच्या जाहिरातींमध्ये दिसायला साध्या-भोळ्या अशा ग्रामीण भागातील लोकांना पैसे देऊन क्रीम वापरण्याचे फायदे सांगायला लावले जातात. क्रीम वापरून त्वचा गोरी होते, हे वारंवार बिंबवले जाते. इंटरनेटच्या माध्यमातून त्वचा गोरी करण्याचे पर्याय शोधणार्या लोकांना टार्गेटेड मार्केटिंगच्या साहाय्याने शोधून या जाहिराती दाखवल्या जातात.
एकीकडे, या जाहिरातींमधून मेटा आणि इन्फ्लुएन्सर्स पैसे कमावतात. दुसरीकडे, क्रीम वापरणार्या ग्राहकांच्या मूत्रपिंडात (किडनीमध्ये) विष साचते, ते आजारी पडतात आणि त्यांना मोठ्या रुग्णालयीन बिलांचा भार सोसावा लागतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर, प्रथमेश फडतरे यांचे रुग्णालयाचे बिल तब्बल 7 लाख रुपये झाले होते.
दुर्दैवाने, एफडीएने 2024 मध्ये बंदी घातलेली अनेक पाकिस्तानी व भारतीय क्रीम्स आजही ऑनलाइन विकली जात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ग्राहकांची दिशाभूल करायला या विषारी क्रीम्सना खोटे पॉझिटिव्ह रिव्ह्यूजही आहेत. यावरून असे दिसते की, कंपन्या स्वतःची ऑनलाइन प्रतिमा जपण्यासाठी सर्वकाही करत आहेत.
पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबर होणारा व्यापार पूर्णपणे थांबवला आहे. तरीदेखील, या क्रीम्स पाकिस्तानातून भारतात कशा येतात? पाकिस्तानी क्रीम्सचे भारतात मार्केटिंग आणि वितरण कोण व कसे करते? यावर केंद्रीय गृहखात्याने त्वरित तपास करायला हवा. तुम्ही तुमच्या ब्यूटीशियन, मसाज तज्ज्ञ किंवा सलूनच्या शिफारशीनुसार नवीन स्किन क्रीम वापरण्याचा विचार करत असाल तर, एफडीएने त्या क्रीमबाबत काही चेतावणी जारी केली आहे का, हे तपासणे उत्तम ठरेल.






