नितीश कुमारांची भाजपसोबत जोरदार सौदेबाजी; देशात जात जनगणना, बिहारला विशेष दर्जा आणि 5 मंत्री….

Bihar News: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर किंगमेकरच्या भूमिकेत आलेला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू भाजपशी जोरदार सौदेबाजी करत आहे. जेडीयूने केंद्रीय मंत्रिमंडळात किमान पाच मंत्रिपदांची मागणी केली असून देशात जात जनगणना करून बिहारला विशेष दर्जा द्यावा, अशीही मागणी केली आहे. नितीश कुमार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे, ग्रामीण विकास आणि जलसंपदा या महत्त्वाच्या मंत्रालयांची मागणी केली असल्याची माहीती समोर येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते दिल्लीत पोहोचले आहेत.
मंगळवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएने 292 जागा जिंकल्या. मात्र, यावेळी भाजप बहुमताच्या आकड्यापासून (272) दूर राहिला आणि केवळ 240 जागा जिंकू शकला. अशा परिस्थितीत देशात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी पंतप्रधान मोदींना मित्रपक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे. या स्थितीत 12 जागा जिंकणारे जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत.
जेडीयूच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एका हिंदी माध्यमाला सांगितले की, बिहारमध्ये विकासाचे वारे वाहण्यासाठी जेडीयू नेतृत्वाला केंद्रीय मंत्रिमंडळातील काही महत्त्वाची मंत्रालये हवी आहेत. जेणेकरून बिहारच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या क्षेत्रात वेगाने काम करता येईल.
नितीश यांना बिहारच्या धर्तीवर संपूर्ण देशात जात करायचीय जनगणना –
जेडीयूच्या आणखी एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संपूर्ण देशात बिहारचे जात जनगणना मॉड्यूल लागू करायचे आहे. केंद्र सरकारकडून देशभरात जात जनगणना व्हावी यासाठी जेडीयू आग्रही असणार आहे. जेणेकरून गरीब आणि मागासवर्गीय लोकांना मुख्य प्रवाहात आणता येईल. बिहारमध्ये गेल्या वर्षी जात जनगणनेच्या आधारे आरक्षणाची व्याप्ती 75 टक्के करण्यात आली होती. याशिवाय नितीश सरकारने गरीब कुटुंबांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची योजनाही आणली आहे.
याशिवाय जेडीयूच्या काही नेत्यांनीही बिहारमध्ये विधानसभा निवडणुका लवकर घेण्याची इच्छा मुख्यमंत्री नितीश यांच्याकडे व्यक्त केली आहे. जेणेकरून जेडीयू लोकसभा निवडणुकीतील विजयाचे भांडवल करून विधानसभेत चांगल्या स्थितीत पोहोचू शकेल. बिहारमध्ये जेडीयूचे सध्या फक्त 45 आमदार आहेत, तर मित्रपक्ष भाजपचे 78 आमदार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएमध्ये सौदेबाजी करण्याच्या स्थितीत आलेली जेडीयू बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आग्रही असणार आहे. बिहारच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असल्याचे जेडीयूचे आमदार खालिद अन्वर यांनी सांगितले. यामुळे जेडीयूला केंद्राकडून विशेष राज्याचा दर्जा आणि बिहारसाठी मोठा निधी हवा आहे.





