Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या आमदारावर गुन्हा दाखल; ‘त्या’ विधानामुळे अडचणीत वाढ
Eknath Shinde: महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याचा आरोप

Eknath Shinde: भाजप आमदार श्वेता महाले आणि एकनाथ शिंदे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका 42 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 79 अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बुलढाण्यातील या प्रकरणामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यातील स्थानिक राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
चिखली मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा वाढदिवस मित्रपरिवाराने बुलढाणा शहरात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी एक रॅली काढण्यात आली होती. त्या रॅलीत ‘बाप तो बाप रहेगा….’ अशा प्रकारे गाणेही वाजवण्यात आले होते.
या गाण्यावर आमदार संजय गायकवाड यांनी, ‘बाप तो बाप है हे ठीक आहे. मात्र हे विधान एखाद्या पुरुषाने केलं तर चालेल, मात्र एखाद्या बाईने म्हटलं बाप तो बाप आहे तर बापाचं शरीर आणणार कुठून….?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे महिलांच्या सन्मानाला आणि लज्जेला धक्का पोहोचल्याचा आरोप करत एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मध्यरात्री संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड?
“राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवाने रॅली काढून वाढदिवस साजरा केला, याचं मला फार वाईट वाटलं. मी जर एखाद्या शेतकऱ्याला मदत केली तर तुम्हीही मदत द्या. वाढदिवसाला खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरीबाला मदत करा. आम्ही अशी उधळपट्टी कधी करत नाही. आमचेही वाढदिवस होतात, पण आम्ही एवढा कधी खर्च करत नाही. बाप तो बाप रहेगा, हे माणसाने बोललं तर बरं आहे. एखाद्या बाईने म्हटले की मी बाप आहे तर बापासारखे शरीर कुठून आणणार आहे. हे शोभते का बोलायला. मग राजकारणातला बाप कोण आहे हे योग्यवेळी आम्ही दाखवून देऊ,” असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांना दिला होता.
श्वेता महाले यांचे प्रत्युत्तर
या प्रकरणावर भाजप आमदार श्वेता महाले यांनी प्रतिक्रिया देताना गायकवाडांवर थेट निशाणा साधला. ‘महिलांच्या शरीरावर बोलणे हा गुन्हा आहे. तुम्ही आमदार असलात तरी संविधानाने तुम्हाला असे बोलण्याचा अधिकार दिलेला नाही. कोण आहे बाप? माझ्यासाठी जनता-जनार्दन ही मायबाप आहे,’ असे म्हणत महाले यांनी गायकवाडांना प्रत्युत्तर दिले.
Heavy vehicles: गणेशोत्सवात शहरात जड वाहनांना ‘नो एन्ट्री’; वाहतूक पोलिसांचे कडक निर्बंध जारी






