Maharashtra politics: आमदारासह 19 जणांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं ?
Maharashtra politics: आंदोलनामुळे श्रीगोंदा-जामखेड राज्यमार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचा आरोप

Maharashtra politics: छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात फाटा परिसरात 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनामुळे श्रीगोंदा-जामखेड राज्यमार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बळीराम गोपीनाथ काकडे यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 100 ते 150 अनोळखी व्यक्तींनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
संबंधितांनी बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच कर्जत-मिरजगाव मार्गावरील प्रवाशांना मज्जाव करत त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने रास्तारोको आंदोलन केल्याचा आरोप आहे.
या गुन्ह्यात आमदार संग्राम जगताप, धवलसिंह मोहिते, ॲड. आकाश सर्जेराव हाळनवर, शुभम माने, चंदनसिंग परदेशी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन तोरडमल, वैभव काळदाते, सावन शेटे, उदयसिंग परदेशी, दीपक गांगर्डे, विठ्ठलसिंग शेडगे, रघुआबा काळदाते, धनंजय बांदल, बाळासाहेब निंबोरे, राहुल मते, प्रसाद कानगुडे, बालाजी लाळगे, सुनील यादव आणि ऋषिकेश काळदाते यांच्यासह इतरांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप
यावरून आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले. “मला टार्गेट केल्याने हा प्रश्न सुटणार नाही. मी नसलो तरी हे काम पुढे सुरूच राहील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्या घटनेविरोधात आवाज उठवणाऱ्या हिंदू कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
काय आहे नेमकं प्रकरण?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुक्यात आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विटंबना प्रकरणातील व्यक्तीला ताब्यातही घेण्यात आले. मात्र, संबंधित प्रकरणात अपेक्षित आणि ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा करत आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात आमदार संग्राम जगताप सहभागी झाले होते. परंतु त्यानंतर आता आंदोलनात सहभागी झालेल्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा:
ED raid on Jauhar University: मोठी बातमी! ईडीचे जौहर विद्यापीठासह १० ठिकाणी छापे






