खटावमधील घोटाळ्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

सातारा – खटाव व खंडाळा तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र मोबदला या नावाने बनावट खाते काढून ग्रामपंचायतीच्या 45 लाख 17 हजार 814 रुपयांच्या अग्रिम रकमेचा अपहार केल्याच्या तक्रारीवरुन खटाव तालुका संगणक परिचालक जलाउद्दीन पटेल (रा. मुसांडवाडी, ता. खटाव), तालुका व्यवस्थापक विशाल उत्तम सुर्यवंशी (रा. म्हासुर्णे, ता. खटाव), विनोद भानुदास साळुंखे (रा. भादे, ता. खंडाळा) या तिघांवर वडूज पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे यांनी दिली आहे. ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून 2016- 17 ते 2021- 22 या कालावधीत अग्रीम रक्कमा जमा होणाऱ्या जिल्हास्तरावरील प्रतापगंज पेठेतील आयडीबीआय बॅंकेतील खात्यात तफावत आढळून आली. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी व जिल्हा स्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठित केल्या होत्या. माण, खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या अग्रिम रकमा शासकीय खात्याव्यतिरिक्त अनधिकृत खात्यावर वर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यावर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश गौडा यांनी साळुंखे यांना दिले होते.
याबाबत साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, खटाव येथील केंद्रातील संगणक परिचालक रियाज पटेल, व्यवस्थापक विशाल सूर्यवंशीमथ व विनोद साळुंखे यांनी आपापसात संगनमत करुन संबंधित खात्यांमध्ये ग्रामपंचायतींनी निर्धारित केलेली रक्कम जमा केली नाही. या तिघांनी 45 लाख 17 हजार 814 रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख तपास करत आहेत.
घोटाळ्यात अनेकांच्या सहभागाची शक्यता
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून झालेल्या घोटाळ्यातील रकमा अनेकांच्या नावे वर्ग झाल्या असल्याने पोलिसांच्या रडारवर ती नावेही येण्याची शक्यता असल्याने अनेकांना धडकी बसली आहे. विशेष म्हणजे गेली काही दिवस हे प्रकरण मिटवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी होत आहे.





