PM Modi : काँग्रेसच्या काळात घोटाळ्यांची मालिका; एनडीए सरकार आल्यावर देशाचे नशीब बदलले – पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बुधवारी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) बैठक पार पडली

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बुधवारी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) बैठक पार पडली. या बैठकीत भाजपसह सर्वच घटक पक्षांचे दिग्गज नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेसच्या काळात एकापाठोपाठ एक घोटाळे झाले, ज्याने देशाचे अतोनात नुकसान केले. मात्र, २०१४ मध्ये एनडीए सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाचे भाग्य बदलले,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘हिंदू ग्रोथ रेट’ नाही, तो ‘काँग्रेस ग्रोथ रेट’ होता –
काँग्रेसच्या काळात संथ आर्थिक विकास सुरु होता असे म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “काँग्रेसच्या काळातील सुस्त कारभार आणि चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकास खुंटला होता. पण त्यांनी स्वतःचे अपयश लपवण्यासाठी या संथ गतीला ‘हिंदू ग्रोथ रेट’ असे नाव दिले. वास्तविक पाहता, देशाच्या या स्थितीला त्या वेळच्या सरकारची धोरणे आणि विचारसरणी जबाबदार होती. त्यामुळे या कुसंस्कृतीला ‘हिंदू ग्रोथ रेट’ नाही, तर ‘काँग्रेस ग्रोथ रेट’ म्हटले पाहिजे.”
पंतप्रधानांनी पुढे आरोप केला की, २००४ मध्ये काँग्रेस सत्ताधारी झाल्यानंतर देश पुन्हा एकदा अस्थिरता आणि हजारो कोटींच्या घोटाळ्यांच्या गर्तेत सापडला, ज्यामुळे विकासाची गती पूर्णपणे मंदावली.
#WATCH | Delhi: Addressing the NDA leaders’ meeting, Prime Minister Narendra Modi says, “The Congress dragged the country into multi-crore rupee scams. The nation’s destiny changed again when the NDA government was formed in 2014. The country witnessed the pace of development… pic.twitter.com/mFRTZgoWun
— ANI (@ANI) June 10, 2026
नेहरूंचा रेकॉर्ड मोडला, जनतेचे मानले आभार –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकारचे प्रमुख राहण्याचा विक्रम आता आपल्या नावावर केला आहे. या बाबतीत त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनाही मागे टाकले आहे.
या यशाचे श्रेय देशवासीयांना देताना पंतप्रधान म्हणाले की, २०१४ पूर्वी देश राजकीय अस्थिरतेचा सामना करत होता. मात्र, काँग्रेसच्या विश्वासघातानंतर जनतेने एनडीएवर विश्वास दाखवला. गेल्या १२ वर्षांत एनडीए परिवाराने हा विश्वास अधिक मजबूत करण्याचे काम केले असून देशाला एक स्थिर आणि खंबीर नेतृत्व दिले आहे.
मध्यमवर्गाला मोठा दिलासा; १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त –
“आजचा महत्त्वाकांक्षी भारतच उद्याच्या विकसित भारताचा पाया आहे,” असे सांगत पंतप्रधानांनी मध्यमवर्गाच्या योगदानाचा गौरव केला. पूर्वीचा मध्यमवर्ग क्लिष्ट टॅक्स रचनेमुळे त्रस्त होता, मात्र आता १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. तसेच ‘फेसलेस टॅक्स’ प्रणालीमुळे करदात्यांचे जीवन अधिक सुसह्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
जागतिक मंदीतही भारताची घोडदौड: विकासदर ७.७% वर –
आज जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्था अडचणीत असताना भारत मात्र जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. आर्थिक प्रगतीची आकडेवारी मांडताना पंतप्रधान म्हणाले की, वर्ष २०२५-२६ मध्ये भारताने ७.७ टक्के विकासदर गाठला आहे, तर ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत हा दर ७.८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. हा वेग देशातील सुधारणा आणि जनतेच्या सामूहिक प्रयत्नांचे यश असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.





