नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; आर्टिलरी सेंटरच्या 15 अधिकाऱ्यांवर गुन्हा

नाशिक: नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमधील 15 अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार आणि लाचखोरीप्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. याशिवाय, गोंदियाच्या परिवहन विभागातील एका इन्स्पेक्टरला नाशिकच्या अँटी करप्शन ब्युरोने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या दोन्ही घटनांनी प्रशासनात हादरे बसले आहेत.
आर्टिलरी सेंटरमधील भ्रष्टाचार –
सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोव्हेंबर 2024 मध्ये आर्टिलरी सेंटरमधील आर्थिक गैरव्यवहारांच्या संशयावरून चौकशी सुरू केली होती. जवानांच्या बिलांवर प्रक्रिया करण्यासाठी ऑडिटर, अकाउंटंट आणि क्लार्क यांच्यासह 15 अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी सीबीआयकडे आल्या होत्या. चौकशीदरम्यान महत्त्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर सीबीआयने 11 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले. या कारवाईने आर्टिलरी सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गोंदियाचा आरटीओ इन्स्पेक्टर जाळ्यात –
दुसरीकडे, गोंदिया जिल्ह्यातील देवरी शिरपूर येथील आरटीओ चेक पोस्टवर कार्यरत असलेला इन्स्पेक्टर योगेश खैरनाग याला नाशिकच्या अँटी करप्शन ब्युरोने लाच घेताना रंगेहाथ अटक केली. वाहनधारकांकडून अवैधरित्या पैसे उकळल्याची तक्रार प्राप्त झालyanंतर एसीबीने योजनाबद्ध सापळा रचला. अचूक वेळ साधत पथकाने खैरनाग याला लाच स्वीकारताना पकडले. लाचेची नेमकी रक्कम अद्याप स्पष्ट झालेली नाही, परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेने परिवहन विभागातही खळबळ उडाली आहे.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह –
या दोन्ही प्रकरणांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. आर्टिलरी सेंटरमधील अधिकाऱ्यांवरील कारवाई आणि आरटीओ इन्स्पेक्टरची अटक यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सीबीआय आणि एसीबी आता या प्रकरणांचा सखोल तपास करत असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





