Baramati : श्रद्धा, सबुरीचा संदेश देत शेकडो साईभक्तांची शिर्डीकडे पायी वाटचाल
Baramati : स्वामी श्रीपाततीर्थ महाराज यांनी बारामतीच्या आध्यात्मिक इतिहासात नोंद घ्यावी, असा पायी पालखी सोहळा सातत्याने आयोजित करण्याचे श्रेय बिरजू मांढरे यांना जाते, असे नमूद केले.

बारामती : साईबाबांचा ‘श्रद्धा, सबुरी आणि सबका मालिक एक’ हा मानवतेचा संदेश जनमानसात रुजविण्यासाठी बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा बारामती ते शिर्डी पायी साई पालखी सोहळा यंदा सलग पंधराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर) नाथपंथीय महाराज, वारकरी संप्रदाय आणि शेकडो साईभक्तांच्या उपस्थितीत पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान झाले.
बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या हस्ते साईबाबांची आरती करून पालखी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक अमोल कावळे, अमर धुमाळ, सोमनाथ गजाकस, गणेश जोजारे, सूरज सातव, यादगार फाउंडेशनचे फिरोज बागवान, शक्तिपात महायोग साधनधाम ट्रस्टचे स्वामी श्रीपाततीर्थ महाराज, नाथपंथीय जैनकवाडी ट्रस्टचे सूरज महाराज थोरात, संतोष आटोळे, संतोष सातव, सतीश खुडे, प्रमोद डिंबळे, धनंजय तेलंगे, शिर्डीचे पै. मदन मोकाटे, रामभाऊ सोनवणे, अनिल आलवणे, बाबूशेठ, तानाजी सोनवणे, अजित सोनवणे, भिवा तांबे, गणेश घोडे, सागर सोनवणे आदी उपस्थित होते. तसेच ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ या मालिकेतील अभिनेते भरत शिंदे, रामभाऊ जगताप आणि सुभाष मदने यांचीही उपस्थिती होती.
स्वामी श्रीपाततीर्थ महाराज यांनी बारामतीच्या आध्यात्मिक इतिहासात नोंद घ्यावी, असा पायी पालखी सोहळा सातत्याने आयोजित करण्याचे श्रेय बिरजू मांढरे यांना जाते, असे नमूद केले. तर ह.भ.प. कपिल महाराज चव्हाण यांनी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत साईबाबांचे विचार पालखी सोहळ्याच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविले जात असल्याचे सांगितले.
सर्व धर्म, जाती आणि पंथांतील नागरिकांना एकत्र आणून आध्यात्मिक आनंद व समाधान देण्याचे काम बारामती-शिर्डी पायी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून होत आहे. साईबाबांच्या विचारांचा प्रसार करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रास्ताविकात बिरजू मांढरे यांनी सांगितले.
साईच्छा सेवा ट्रस्ट, बीएम ग्रुप, वस्ताद लहुजी साळवे दहीहंडी मंडळ, कै. भाऊसाहेब मांढरे मित्र परिवार, श्रीहरी भाऊ तेलंगे मंडळ आणि जय भवानी मित्र मंडळ यांच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले, तर राजू मांढरे यांनी आभार मानले.





