ताम्हिणी घाटात भीषण अपघात; कार एसटी बसमध्ये घुसली, चालकासह महिलेचा मृत्यू

पाली : रायगड जिल्ह्याच्या हद्दीत एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ताम्हिणी घाटात एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (ता. 4) दुपारी एक-दीडच्या सुमारास ताम्हिणी घाटात रेस्ट हाऊसच्या अलीकडे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की खेड – चिंचवड ही एसटी बस पुण्याच्या दिशेकडे जात होती. तर, स्विफ्ट कार विळे गावाच्या दिशेकडे येत होती. उतार व वेग असल्यामुळे, तसेच गाडीवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट कार एसटी बसला समोर जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती, की यामध्ये स्विफ्ट चालकाच्या बाजूचा भाग बसमध्ये शिरून पूर्ण चेपला गेला आहे.
त्यामुळे कारचालक व चालकाच्या पाठीमागे बसलेली ज्येष्ठ महिला यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच हे दोन्ही मृतदेह कारमध्येच अडकून पडले. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी जाऊन त्यांनी आधुनिक साधनांच्या माध्यमाने दुपारी 3 वाजता अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु केले. कारमधील तीन जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे. तर, एसटी मधील कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
जत-सांगोला महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू
जत-सांगोला महामार्गावर जतपासून चार किलोमीटर अंतरावर आयशर ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला. देवदत्त दिलीप शिंदे (वय 20) व यशराज नाना शिंदे (वय 15, दोघे रा. शेगाव) अशी मृतांची नावे आहेत.
दुचाकीवरील देवदत्त शिंदे हा चालक म्हणून काम करत होता. तर यशराज हा इयत्ता आठवीत शिकत होता. मोटरसायकलवरील दोघेजण शेगाववरून जतकडे येत होते. ते जतजवळ जतपासून चार किलोमीटर सागर बाहुबली कापड दुकानाच्या अलीकडे आले असता ट्रकने समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात यशराज याचा जागीच मृत्यू झाला.





