Akola Accident : भीषण अपघात…! अकोल्यात कार पुलावरून कोसळली; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Akola Balapur road accident : अकोला जिल्ह्यातील वाडेगाव-बाळापूर रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. पातूर येथून बाळापूरकडे जाणारी MH 30 AZ 7557 क्रमांकाची चारचाकी कार कुपटा गावाजवळील वाघाडी नदीच्या पुलावरून खाली कोसळली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कन्हैयासिंग ठाकूर (वय 54), विशाल भानुदास सोलनकर (वय 45), सुनील शर्मा (वय 45) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नवे आहेत. तर आशिष कन्हैयासिंग ठाकूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना वाडेगावकडून बाळापूरकडे जात असताना, कुपटा गावाजवळील वाघाडी नदीच्या पुलावर घडली आहे. कार पुलाच्या कठड्याला धडकून सुमारे १५० फूट खोल नदीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पातूर MH 30 ऐ-झेड 7557 क्रमांकाची चारचाकी गाडी थेट नदीच्या पुलावरील कठडे तोडून पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की कार जवळपास 5 ते 6 वेळा पलटी होत खाली कोसळली. या वाहनातील तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मांडवा कुपटा येथील ग्रामस्थांनी गाडीमध्ये असलेल्या जखमींना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. तातडीने सर्व जखमींना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील तिघांचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. या प्रकरणात बाळापुर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.





