हिंगोली-कळमनुरी मार्गावर कारला आग, चालक गंभीर जखमी; सुदैवाने चौघे बचावले

हिंगोली – हिंगोली ते कळमनुरी मार्गावरील खानापूरचित्ता शिवारात मंगळवार, (दि. २० मे) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. या घटनेत कारचालक विनायक सोळंके (रा. येहळेगाव सोळंके, ता. औंढा नागनाथ) गंभीररित्या भाजले गेले, तर कारमधील तीन महिला आणि एक लहान मुलगी बालंबाल बचावली. कार पूर्णपणे जळून खाक झाली असून, मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक सोळंके हे सकाळी हिंगोली येथून कारने (भाड्याने) लग्नसोहळ्यासाठी निघाले होते. कारमध्ये हिंगोली शहरातील गंगानगर परिसरातील तीन महिला आणि एक लहान मुलगी प्रवास करत होते. हिंगोलीपासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावर खानापूरचित्ता शिवारात मुलीला तहान लागल्याने विनायक यांनी कार हॉटेलसमोर थांबवली. यावेळी तीन महिला आणि मुलगी पाण्यासाठी खाली उतरल्या, तर विनायक कारमध्येच बसले होते.
दरम्यान, कारच्या वायरींगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक आग लागली. प्रसंगावधान राखून विनायक कारमधून खाली उतरले, परंतु तोपर्यंत त्यांचे हात आणि पाय भाजले गेले. सुदैवाने इतर प्रवाशी हॉटेलजवळ असल्याने त्यांचा जीव वाचला.
घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार अनिल डुकरे, आकाश पंडीतकर, रमेश जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हिंगोली पालिकेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. भाजलेल्या विनायक सोळंके यांना तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.





