कात्रजच्या खोल दरीत ट्रक कोसळला; चालक गंभीर जखमी, अग्निशामक दलाने वाचवले प्राण

पुणे : कात्रज जुन्या बोगद्यामधून पुण्याकडे येताना पहिल्या तीव्र वळणानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दहा टायर असलेला ट्रक (MH12 KP 1073) थेट 200 फूट खोल दरीत कोसळला. हा भीषण अपघात सायंकाळी 4:15 वाजता घडला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला कळवल्याने कात्रज अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले आणि खोल दरीतून जखमी चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
विकास बालाजी रसाळ (वय 32, रा. लातूर) असे जखमी चालकाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, ट्रकमध्ये कोणतेही सामान नव्हते आणि चालक एकटाच वाहन चालवत होता. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तीव्र वळण आणि चालकाचे नियंत्रण सुटणे यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे चालकाचा जीव वाचला असला, तरी त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. या घटनेने कात्रज परिसरातील रस्त्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.





