Pune news : कात्रज घाटात कारला भीषण आग; कुटुंबातील ६ जण थोडक्यात बचावले, गाडी जळून खाक

कात्रज : पुणे-सातारा मार्गावरील कात्रज जुन्या घाटात हुंडई क्रेटा कार (MH 12 QT 3520) ला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कात्रज बोगद्याजवळ असलेल्या ओमकार फर्निचर दुकानासमोर आज (दि. ०३) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सुदैवाने गाडीतील सर्व सहा प्रवाशांचा जीव वाचला, आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील सॅलिसबरी पार्क येथील रहिवासी मुन्नावर अली खान हे आपल्या कुटुंबासह महाबळेश्वर येथील सहलीवरून परतत होते. खेड-शिवापूर येथे इंधन भरल्यानंतर कात्रज घाटात प्रवेश करताच, बोगद्याजवळ त्यांच्या गाडीच्या बोनेटमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुन्नावर यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ गाडी थांबवली आणि गाडीतील पाच जणांसह स्वत: बाहेर पडले. यामुळे मोठी दुर्घटना टळली, आणि सर्व प्रवासी सुखरूप राहिले.
या घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आटोकाट प्रयत्न करून आग विझवली, परंतु तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेमुळे कात्रज घाट रस्त्यावर काही काळ तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. स्थानिक पोलिसांनी त्वरित कारवाई करत जळालेली कार रस्त्याच्या बाजूला हटवली आणि वाहतूक सुरळीत केली.
या घटनेने पुणे-सातारा मार्गावरील वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाहनांच्या नियमित देखभालीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.





