Haryana Election : विनेश फोगट यांच्या विरोधात भाजपने रिंगणात उतरवलेले कॅप्टन योगेश बैरागी कोण आहेत?

Haryana Assembly Election 2024: कुस्तीपटू विनेश फोगट यांच्या विरोधात भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या भाजप उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत कॅप्टन योगेश बैरागी यांना जुलाना येथून तिकीट मिळाले आहे.
जुलानामध्ये भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी विरुद्ध काॅंग्रेसच्या विनेश फोगट यांच्यात जोरदार लढत पहायला मिळणार आहे. गेल्या शुक्रवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 32 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. जुलानाचे तिकीट मिळालेल्या विनेशच्या नावाचा त्यात समावेश होता. विनेश फोगट ही चरखी दादरी जिल्ह्यातील बलाली येथील रहिवासी असल्याची माहिती आहे, तर तिचे सासर जुलाना येथे आहे. जुलाना येथील बख्ता खेडा हे त्यांचे पती सोमवीर राठी यांचे वडिलोपार्जित गाव आहे.
हरियाणा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली, 21 उमेदवारांना तिकीट –
रिपोर्टनुसार, कॅप्टन योगेश कुमार बैरागी हे भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) चे उपाध्यक्ष आहेत. याशिवाय, त्यांच्याकडे भाजप स्पोर्ट्स सेल (हरियाणा) चे सहसंयोजक पद देखील आहे. तळागाळात लोकांसाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख असल्याचे बोलले जाते. याशिवाय कॅप्टन योगेश बैरागी यांची गणना भाजपच्या उदयोन्मुख तरुण नेत्यांमध्ये केली जाते.
सलग तिसऱ्यांदा विजय मिळवण्याकडे भाजपचे लक्ष –
भाजपने हरियाणात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना काँग्रेसकडून कडवे आव्हान मिळण्याची अपेक्षा आहे. राज्यातील सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. 90 सदस्यीय राज्य विधानसभेसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.





