IND vs AUS 4th Test : “आता त्यानं भविष्याचा अंदाज घ्यावा..”; मेलबर्न कसोटी पराभवानंतर शास्त्रींकडून कर्णधार रोहितला कानपिचक्या…

Captain Rohit Sharma – ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील खराब कामगिरीमुळे भारताचे वरिष्ठ फलंदाज रोहित आणि कोहली यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. रोहित शर्माने पाच डावांमध्ये 31 धावा केल्या आहेत, ज्या ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही परदेशी कर्णधाराची सर्वात कमी सरासरी आहे. पर्थ कसोटीत शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीला देखील कामगिरीत सातत्य राखता आले नाही. असे असले तरी देखील विराटमध्ये अजूनही 3-4 वर्षांचे क्रिकेट शिल्लक असून रोहित शर्माला मात्र कसोटी व सदोष तंत्रावर मात करताना भविष्याचा अंदाज घेण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी क्रिकेटपटू व समालोचक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना शास्त्री म्हणाले, विराट पुढील तीन-चार वर्षे खेळू शकतो, मात्र कर्णधार रोहितला निर्णय घ्यावा लागणार आहे. सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना त्याचे फुटवर्क अजूनही समान नाही. तो फटका मारतानाच उशीर करत आहे. त्यामुळे अजूनही चेंडूकडे त्याचा पाय जात नासल्यानेच तो सातत्याने बाद होत असल्याचे शास्त्री म्हणाले.
दुसऱ्या सत्रापर्यंत आपण ही लढत जिंकू शकत हे ऑस्ट्रेलियाला स्पष्ट झाले होते. यावर बोलताना शास्त्री म्हणाले, पंत बाद होणे, हाच सामना फिरवणारा क्षण होता. तोपर्यंत भारताने केवळ 3 गडी गमावले होते. तिसऱ्या सत्रात पंत बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचे मनोबल वाढले. ते याच संधीच्या शोधात होते, त्यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.
रोहित कर्णधार असल्यानेच संघात
रोहित शर्माने आतापर्यंत 20 हजारांच्या जवळपास धावा केल्या आहेत. मात्र, सध्या तो ज्या प्रकारे संघर्ष करत आहे, ते पाहून त्याला फॉर्म अजिबात साथ देत नसल्याचे दिसून येत आहे. तो संघामध्ये फक्त कर्णधार म्हणून खेळत आहे, तो कर्णधार नसता तर कदाचित आता तो संघामध्ये नसता, अशी टीका माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केली. रोहित शर्मा गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याने मायदेशात देखील बांगलादेश विरुद्ध केवळ 42 तर न्यूझीलंड विरुद्ध केवळ 91 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर देखील त्याने 5 डावांमध्ये केवळ 31 धावा केल्या आहेत.





