उमेदवारांनो, सभा-मिरवणुका घ्या पण ‘हे’ काम कराच

पुणे – शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या जाहीर झालेल्या निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारच्या सभा, मिरवणुकांसाठी स्थानिक पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. तसेच दुचाकी रॅलीमध्ये दहापेक्षा जास्त वाहनांचा सहभाग असू नये, असा आदेश पुणे पोलिसांनी दिला आहे.
शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी दि. डिसेंबर रोजी मतदान, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याबाबतची आचारसंहिता दि.7 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 36 नुसार आदेश जारी केला आहे.
अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) व सहपोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.
या आदेशानुसार, सभा, मिरवणुका, दुचाकी रॅली यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी आवश्यक आहे. पोलिसांच्या मदतीने मिरवणुकीचा मार्ग निश्चित करणे, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनीक्षेपकाचा वापर करू नये, असे संबंधित आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोबतच अधिकृत परवानाधारक शस्त्रे आणि हत्यारे बाळगून फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.





