nagar | उमेदवारांच्या खर्चाची आज होणार तपासणी

नगर (प्रतिनिधी) – नगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची शुक्रवार (दि. ३ ) रोजी पहिली तपासणी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात होणार आहे. यासाठी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहुन त्यांच्या खर्चाचा हिशोब सादर करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.
निवडणूक खर्च तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असुन ३ मे, ७ मे व ११ मे रोजी उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यात येणार आहे. नगर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचे दैनंदिन खर्च उमेदवार खर्च नोंदवहीत नोंदवणे अपेक्षित आहे.
दैंनदिन खर्चाची नोंदवही संपूर्ण प्रचार कालावधीत किमान तीन वेळा खर्च निरीक्षकांसमोर सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी विहित केलेला दिनांकाला खर्चाचे रजिस्टर, मूळ प्रमाणके, अद्यावत बँक पासबुक, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेली सर्व परवानगी पत्रे घेऊन वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.





