Satara | वेळेत उपचार केल्यास कॅन्सर बरा होतो

रहिमतपूर (प्रतिनिधी) – कॅन्सरबद्दल महिलांच्या मनात भीती व गैरसमज असतात, तर मला कॅन्सर होणारच नाही, असा काही महिलांचा गैरसमज असतो. कॅन्सर कोणत्याही वयात होऊ शकतो; पण प्रत्येक गाठ कॅन्सरचीच असते असे नाही.
स्तन हे स्त्रियांच्या शरीराचे महत्त्वाचे अवयव आहेत. ते निरोगी असावेत याची दक्षता घेणे आवश्यक आहे. गाठ जेवढी छोटी, तेवढे उपचार करणे सोपे जाते. वेळेत उपचार केल्यास कॅन्सर बरा होतो, असे मत डॉ. स्नेहल पाटील यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यदिन आणि सौ. चित्रलेखा माने-कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रहिमतपूर येथे महिलांसाठी कर्करोग जागृती शिबिर व मोफत औषध वाटप नुकतेच करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर डॉ. रेश्मा राजभोई, सौ. चित्रलेखा माने-कदम, सौ. प्रियंका कदम उपस्थित होत्या.
डॉ. पाटील म्हणाल्या, गाठ येणे, त्वचा ओढणे, निपल्समधून पाणी येणे, काखेत बदल दिसणे, जखम, लालसरपणा याकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये. विशेषता चाळीशीनंतर जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.
यासाठी मॅमोग्राफी करणे गरजेचे आहे. डॉ. रेश्मा राजभोई म्हणाल्या, एचपीव्ही व्हायरसमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. देशात प्रत्येक सातव्या मिनिटाला कॅन्सरने एका महिलेचा मृत्यू होतो. वेळेत उपचार केल्यास कॅन्सर बरा होतो.
त्याचे समूळ उच्चाटनही करता येते. त्यासाठी महिलांनी वेळेत तपासणी करणे गरजेचे असते. प्रतिकारक्षमता कमी असलेल्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. जागरुकतेचा अभाव, स्त्रीसुलभ लज्जा, वेळेत तपासण्या न करणे, नैराश्य, ही कॅन्सरवाढीची कारणे असतात.
नदी जशी कचरा किनार्याच्या बाजूला टाकून वाहते, तसे आपले जीवन असले पाहिजे. निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात पालेभाज्यांचा समावेश हवा. दररोज चालणे, व्यायाम केल्याने प्रतिकारशक्ती वाढते.
यावेळी महिलांच्या शंकांचे निरसन डॉ. रेश्मा राजभोई व डॉ. स्नेहल पाटील यांनी केले. सौ. चित्रलेखा माने-कदम यांनी प्रास्ताविक केले. सौ. स्वाती कदम यांनी सूत्रसंचालन केले. सौ. प्रियंका भोसले यांनी आभार मानले.





