Satara Crime : लिफ्ट मागून लुटणारा पाच तासांत ताब्यात! रहिमतपूर पोलिसांची कारवाई; मुद्देमाल हस्तगत
Satara Crime : कोरेगाव-रहिमतपूर मार्गावर जबरी चोरीची खळबळजनक घटना; पोलीस पथकाकडून गुन्ह्याची काही तासांतच उकल.

Satara Crime – रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुघी गावात लिफ्ट मागून एकास लुटल्याचा प्रकार उघडकीस आला असून, अवघ्या पाच तासांत गुन्ह्याची उकल करत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय विठ्ठलराव गाडे रा. रहिमतपूर यांना अज्ञाताने लिफ्ट मागितली.
यानंतर गाडे कोरेगाव-रहिमतपूर रस्त्याने येत असताना अज्ञाताने त्यांना लघुशंकेच्या बहाण्याने दुचाकी थांबविण्यास सांगितले. दुचाकी थांबल्यानंतर त्याने गाडे यांना मारहाण करुन धमकावून 16.9 ग्रॅम वजनाची 2 लाख 69 हजार 132 रुपये किंमतीची त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली. घटनेनंतर गाडे यांनी तत्काळ रहिमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सपोनि नेवसे यांच्या सूचनांनुसार पोलीस पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि स्थानिक खबर्यांच्या मदतीने संशयिताचा माग काढण्यात आला. अवघ्या पाच तासांत संशयितास ताब्यात घेत त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून गाडे यांच्याकडून जबरी चोरी करुन नेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे करीत आहेत.





