पुणे जिल्हा | लाडक्या बहिणीसाठी चार चाकी गाडीची अट रद्द करा

पळसदेव, (वार्ताहर) – सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बोलला सुरु आहे. राज्यातील बहुतेक सेवा केंद्रावर अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी पाहावयास मिळत आहे; मात्र सर्व्हर जॅममुळे लाडक्या बहिणींना हताश होऊन परत जावे लागत आहे. असे असले तरी या योजनेसाठी अर्ज करण्याच्या अटींमध्ये चारचाकी गाडीची महत्वाची अट शासनाने घातली आहे, ती अट तातडीने रद्द करावी अशी मागणी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात होत आहे.
राज्य सरकारने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजनेची घोषणा केली आहे; मात्र यामध्ये अनेक जाचक अटींमुळे ग्रामीण भागातील व आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिक यापासून वंचित राहणार आहेत. ग्रामीण भागासह शहरातील अनेकांनी बँक व फायनान्सकडून कर्जावर चाकचाकी गाड्या घेतल्या आहेत.
काहीजण यावर आपला चरितार्थ चालवत आहे. हे लाभार्थी घरी गाडी असली तरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत. त्यांचा रोजीरोटीसाठी प्रश्न आजही गंभीर आहे. त्यामुळे सरकारने या योजनेसाठी चारचाकी गाडीची अट रद्द करावी, अशी मागणी लाडक्या बहिणीकडून होत आहे. सरकारने जाणीवपूर्वक अशा आटी घालून सर्वसामान्य नागरिकांना वंचित ठेवण्याचा घाट घातला असल्याचं मत येथील महिला बहिणींकडून व्यक्त केलं जात आहे.





