कॅनडाची भारतीय विमानांना तीस दिवसांची बंदी

टोरांटो – कॅनडाने भारत आणि पाकिस्तान या देशांतील विमानांना तीस दिवसांची बंदी लागू केली आहे. या दोन्ही देशांतील करोना स्थितीमुळे कॅनडा सरकारने हा निर्णय घेतला आहे. भारतातातील करोना रूग्णांचा रोजचा आकडा तीन लाखांहून अधिक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कॅनडा सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून त्यातून प्रवाशांचा नाहक गोंधळ उडाल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.
गुरूवारी रात्रीपासून हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कॅनडात करोना पसरू नये म्हणून अनेक निर्बंध जारी केले गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक आणि पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग ओढवले.
कॅनडात करोनाची तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेऊन सरकारने ही उपाययोजना केली आहे. तथापि, तेथील विरोधी पक्षांनी या निर्बंधांमुळे लोकांना ज्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्याबद्दल सरकारला धारेवर धरले आहे.





