Jharkhand Election 2024 : झारखंडमधील प्रचारही समाप्त; ३८ जागांसाठी बुधवारी होणार मतदान

Jharkhand Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचारही सोमवारी समाप्त झाला. आता त्या राज्यात विधानसभेच्या ३८ जागांसाठी बुधवारी मतदान होईल. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत. त्यातील ४३ जागांसाठी पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला मतदान झाले.
आता अखेरच्या टप्प्यासाठी ते राज्य सज्ज झाले आहे. त्या टप्प्यात एकूण ५२८ उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यांचे भवितव्य १ कोटी २३ लाख मतदार ठरवतील.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांच्या पत्नी कल्पना, माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी आदींसारख्या प्रमुख उमेदवारांमुळे दुसऱ्या टप्प्याचे महत्व आणखीच वाढले आहे.
झारखंडमध्ये सत्तारूढ झामुमो-कॉंग्रेस-राजद आघाडी विरूद्ध भाजप आणि मित्रपक्ष अशी लढत होत आहे. झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी २३ नोव्हेंबरला जाहीर होतील.
दरम्यान, उत्तरप्रदेशसह काही राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांसाठीचा प्रचारही थंडावला. त्या पोटनिवडणुकांसाठीही २० नोव्हेंबरला मतदान होईल.





