पुणे | पुण्याहून कनार्टकांत उंटांची तस्करी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कर्नाटकमधील कत्तलखान्यासाठी पुण्यातून उंटांची तस्करी केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. रावेत येथून आठ ऊंट घेऊन कर्नाटककडे निघालेला ट्रक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुणकुमार चिनाप्पा (२८, रा. कुदपल्ली, जिल्हा कृष्णागिरी, कर्नाटक) आणि लखन जाधव ( ३०, रा. करपटे वस्ती रोड, काळेवाडी फाटा, वाकड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कृष्णा सातपुते ( २४, रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे.
चिनाप्पा हा ट्रकचालक असून लखन हा ऊंट सवारीचे काम करतो. फिर्यादी हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. “रावेत येथून एका ट्रकमध्ये काही ऊंट निर्दयतेने कोंबण्यात आले आहेत. त्यांना कत्तलीसाठी कर्नाटकात नेण्यात येणार आहेत,’ अशी माहिती मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी माहिती दिली.
त्यानंतर सातपुते आणि त्यांचे मित्र प्रसाद दुडे, आशुतोष मारणे, अजय भंडारी, सागर धिडे हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात थांबले होते. रात्री पावणेदहाच्या सुमारास ट्रक चांदणी चौकाकडून येणारा ट्रक त्यांनी पाहिला. त्यांनी पाठलाग केला आणि वडगाव पुलाजवळ ट्रक थांबविण्यात आला.
ट्रकचालकाची चौकशी केली. सोबतच ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये आठ ऊंट एकत्रित बांधून ठेवण्यात आल्याचे दिसले. या ट्रकला चारही बाजूंनी ताडपत्री लावून उंट झाकण्यात आलेले होते.
उंटांचे पाय आणि तोंड निर्दयतेने बांधण्यात आलेले होते. ट्रकमध्ये चारापाण्याची व्यवस्था नव्हती. या उंटांना जखमा झाल्या होत्या. कार्यकर्त्यांनी ११२ नंबरला दूरध्वनी करुन पोलिसांची मदत मागितली. पोलिसांनी ट्रक आणि उंट ताब्यात घेतले. या उंटांना पांजरपोळ येथे ठेवण्यात आले आहे. कार्यकर्त्यांना शिवशंकर स्वामी आणि अॅड. आशिष बारीक यांनी मार्गदर्शन केले, असे शिवराज संगनाळे यांनी सांगितले.





