कलकत्ता उच्च न्यायालयाचा ममतांसाठी मनाई आदेश; राज्यपालांविषयी बदनामीकारक वक्तव्ये करू नयेत

Mamata Banerjee – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी कलकत्ता उच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम आदेश जारी केला. त्यानुसार, राज्यपाल सी.व्ही.आनंद बोस यांच्याविषयी बदनामीकारक किंवा अयोग्य वक्तव्ये करण्यास ममतांना मनाई करण्यात आली.
बोस आणि ममतांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस सरकारमध्ये सातत्याने विविध मुद्द्यांवरून संघर्ष सुरू आहे. अलिकडेच तृणमूलच्या दोन नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीवरून सत्ताधारी विरूद्ध बोस अशी तणातणी पाहावयास मिळाली.
राजभवनमधील काही घटनांवरूनही सत्ताधाऱ्यांनी बोस यांना लक्ष्य केले. त्यामध्ये ममताही मागे राहिल्या नाहीत. त्यामुळे बोस यांनी ममता आणि तृणमूलच्या काही नेत्यांविरोधात बदमानीचा खटला दाखल केला.
संबंधितांना बदनामीकारक वक्तव्ये करण्यापासून रोखणारा अंतरिम आदेश जारी करण्याची विनंतीही त्यांनी केली. त्यावरून न्यायालयाने अंतरिम आदेश जारी केला. संबंधित प्रकरणी पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होईल.
त्याआधी न्यायालयाने ममता आणि तृणमूलच्या इतर नेत्यांना प्रतिज्ञापत्रं सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली. ती प्रतिज्ञापत्रं सादर झाल्यानंतर बोस त्यांचे उत्तर आठवडाभराच्या कालावधीत देऊ शकतील.





