सीए फाउंडेशन, इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) सप्टेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटन्सी (सीए) फाउंडेशन आणि इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.
सीए इंटरमिजिएट परीक्षेसाठी १ लाख ३९ हजार ६४६ उमेदवार प्रवेशित होते. ४५९ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. यात ग्रुप १ च्या परीक्षेला ६९ हजार २२७ उमेदवार बसले होते. यातील १० हजार ५०५ म्हणजेच १५.१७ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले. ग्रुप २ च्या परीक्षेला ५० हजार ७६० उमेदवार बसले.
त्यातील ८ हजार ११७ म्हणजेच १५.९९ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले. दोन्ही ग्रुपमध्ये २३ हजार ४८२ उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यातील १ हजार ३३० म्हणजेच ५.६६ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेत मुंबईतील पारमी उमेश पारेख हिने ४८४ (८०.६७ टक्के) गुणांसह देशात प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर चेन्नईची तान्या गुप्ता ४५९ ( ७६.५० टक्के) गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. नवी दिल्लीतील विधी जैन हिने ४४१ (७३.५० टक्के) गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
चार्टर्ड अकाउंटन्सी (सीए) फाउंडेशन परीक्षेसाठी ७८ हजार २०९ उमेदवार प्रवेशित होते. एकुण ४५३ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला एकुण ७० हजार ४३७ उमेदवार बसले होते. त्यातील १३ हजार ८५८ म्हणजेच १९.६७ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. 3७ हजार ७७४ मुलांनी परीक्षा दिली होती. त्यातील ७ हजार ७३२ म्हणजेच २०.४७ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. ३२ हजार ६६३ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यातील ६ हजार १२६ म्हणजेच १८.७६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.





