Turkey – तुर्कीयेमध्ये भडकलेल्या वणव्यामुळे देशातील चौथ्या क्रमांकाच्या बुरसा सहराला धोका निर्माण झाला आहे. वणव्यामुळे या शहरातील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी पलायन करावे लागले आहे. रात्रभरात देशाच्या वायव्य भागातल्या डोंगरावर लागलेल्या या वणव्याने बुरसा शहराला वेढले. त्यामुळे रात्रीच्यावेळी या शहराच्या पूर्वेकडील उपनगरांच्या परिसरात लाल ज्वाळा दिसत होत्या. संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. शहराच्या इशान्येकडील काही गावांमधून १,७६५ गावकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याचे बुरसामधील सरकारी कार्यालयाने म्हटले आहे. जंगलामध्ये लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे १,१०० कर्मचारी प्रयत्नशील आहेत. बुरसा आणि राजधानी अंकाराला जोडणाऱ्या महामार्गाच्या आजूबाजूच्या जंगलांमध्येच आग लागली असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या प्रांतासाठी संसदेतील विरोधी नेते ओर्बन सारिबल यांनी ही आपत्ती सर्वनाश करणारी असल्याचे म्हटले आहे. सकाळपर्यंत वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. मात्र तरी आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवण्यात आले आहेत. आगीमुळे या परिसरातील शेतजमिन आणि पाईन वृक्षांची राखरांगोळी झाली आहे. जून पासून वणव्यांची मालिका जून महिन्.पासून तुर्कीयेमध्ये दररोज दोन वणवे लागत आहेत. देशभरात ७६ ठिकाणी आग लागली असून त्यासाठी अग्निशामक दल अहोरात्र प्रयत्नशील आहे, असे वनमंत्री इब्राहिम यामुकली यांनी सांगितले. हंगाम नसलेली उष्णतेची लाट, कोरडे हवामान आणि वाऱ्यामुळे हे वणवे अधिकच भडकले आहेत. तुर्कीयेतील अग्नेयेकडील सिमाक प्रांतात शुक्रवारी ५०.५ अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले आहे. देशातील १३२ अन्य ठिकाणी जुलै महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. बुरसा शहराबरोबर कारबुकलाही या वणव्याचा धोका आहे. इझमिर आणि बिलेसिक या प्रांतांमधील वणव्यांनी गंभीर रुप धारण केले आहे. या वणव्यात गेल्या काही आठवड्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात बचाव पथकातील १० जणांचा आणि वन विभागातील एकाचा समावेश आहे. जून महिन्यापासून देशातील ३३ प्रांतांमध्ये वणव्याच्या घटना घडल्या आहेत.