अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या घरी चोरी; व्हिडिओ शेअर करत केले ‘हे’ आवाहन

Actor Jahnavi Killekar| ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २०२२ मध्ये ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने साकारलेले खलनायिकेचे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र सध्या जान्हवीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जान्हवीच्या घरी चोरी झाल्याचे तिने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.
जान्हवी किल्लेकरने “नमस्कार, आज अचानक व्हिडीओ बनवण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. माझ्या बहुतेक चाहत्यांना माहित आहे की, माझं पेणमध्ये एक घर आहे. ते आमचं वीकेंड होम असून आम्ही फक्त शनिवार, रविवारी त्या घरी जातो. माझे आई आणि बाबा देखील वीकेंडला आमच्याबरोबर येतात. पण या घरात नुकतीच चोरी झाली आहे. आमच्या घरातून चोरांनी स्पिकर्स, माझ्या भावाची गिटार, महागडी घड्याळं, माझ्या आईच्या साड्या अशा बऱ्याच वस्तू नेल्या आहेत.”
यावेळी तिने लोकांना आवाहनही केले आहे, “जर तुमचंही असं बंद घर असेल तर, प्लीज काळजी घ्या. सध्या चोरांचा खूपच सुळसुळाट झाला आहे. आपण अनेकदा खूप आवडीने गोष्टी घेतो. पण, आमच्या घरच्या अशाच काही खास वस्तू चोर घेऊन गेले. पेणचे पोलीस या सगळ्या प्रकरणाचा शोध घेत आहेत. पण, चोर सापडतील की नाही याची खात्री देता येणार नाही.”
या घटनेचा जान्हवीच्या आईला मोठा धक्का बसला आहे. त्यांना अर्धांगवायूचा अटॅक आला आहे. “माझ्या आईने या सगळ्या गोष्टींचं दडपण घेतल्यामुळे तिला अटॅक पॅरालिसिस अटॅक आला. अजूनही ती रुग्णालयात आहे. त्यामुळे तुमचंही बाहेर कुठे घर असल्यास काळजी घ्या,” असे तिने या व्हिडिओद्वारे सांगितले आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्याही विविध प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा:





