BGT 2024 : बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनं बुमराहबद्दल केलं मोठे वक्तव्य….

Steve Smith vs Jasprit Bumrah : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्षाच्या अखेरीस बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. याआधी कांगारू संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कौतुक केले आहे. स्मिथने बुमराह हा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असल्याचे म्हटले आहे.
35 वर्षीय स्टीव्ह स्मिथ गेल्या काही मालिकांपासून ऑस्ट्रेलियासाठी डावाची चांगली सुरुवात करत आहे आणि भारताविरुद्धही त्याच्याकडून अशीच कामगिरी अपेक्षित आहे. स्मिथला भारताच्या एका गोलंदाजाची भिती वाटत आहे. तो त्या गोलंदाजाला सर्वात मोठे आव्हान मानत आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा सामना करणे आपल्यासाठी आव्हान असेल, असे स्मिथने म्हटले आहे. त्याबरोरच त्यानं बुमराहचे खूप कौतुक केले आहे.
स्मिथने एका स्पोर्ट्स चॅनलशी संवाद साधताना सांगितले की,” बुमराह एक महान गोलंदाज आहे. तुम्ही फलंदाज म्हणून त्याचा सामना नवीन चेंडूने करत असाल किंवा जुन्या चेंडूनं करत असाल, त्याच्याकडे फलंदाजाला प्रत्येक प्रकारे अडचणीत आणण्याची प्रतिभा आहे. बुमराह हा कसोटीमध्येच नाही तर तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते.”
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची सुरुवात होणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियात गेल्या दोन मालिका जिंकल्या आहेत. भारताला या संघाविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक साधायची असेल, तर बुमराहचे योगदान खूप महत्त्वाचे असेल. बुमराहकडे ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी असेल. बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत बुमराहने चमकदार कामगिरी केली होती आणि पाहुण्या संघाचा पहिला डाव लवकर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Ind vs Ban 1st Test : चेन्नई कसोटीत बुमराहची कमाल, 4 विकेटसह आणखी एका विक्रमाला घातली गवसणी…
प्रभाव सोडण्यात यशस्वी ठरला आहे बुमराह…
भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा प्रमुख, बुमराहने जानेवारी 2018 मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून प्रभाव पाडला आहे. त्याने आतापर्यंत 37 सामन्यात 164 विकेट घेतल्या आहेत. भारताला अनेक सामने जिंकून देण्यात बुमराहचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. या वर्षी जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही त्याने प्रभावी कामगिरी केली आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
स्टीव्ह स्मिथ 10 हजार धावांच्या जवळ….
ऑस्ट्रेलियाकडून 109 कसोटी सामने खेळलेला स्टीव्ह स्मिथ या हायप्रोफाईल मालिकेदरम्यान 10,000 कसोटी धावांचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. त्याने आतापर्यंत 9 हजार 685 धावा केल्या आहेत.





