वाघोलीत बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचा जंगी आखाडा उत्साहात

वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथील भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपारिक पद्धतीने अभिषेक करून श्रद्धेने भैरवनाथाची पूजा करण्यात आली. वाघोलीत बारा वर्षानंतर प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास चार दिवस बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
बैलगाडा शर्यतीसाठी थार गाडी, ट्रॅक्टर, बुलेट, फ्रिज, टीव्ही, बारा दुचाकी तसेच वैयक्तिक स्वरूपात लाखो रुपयांची मान्यवरांनी बक्षीसे ठेवली होती. पारंपरिक देवाच्या पालखी सोहळ्यात ढोल लेझीम पथकाला देखील ग्रामस्थांच्या वतीने लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
वाघोली ग्रामस्थांनी आलेल्या परंपरा यांची जपणूक केल्यामुळे भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या योगदानाबद्दल नागरिकांनी यात्रेचा विलक्षण अनुभव घेतला. राज्यातील नामांकित मल्लांच्या निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात आला होता. आखाड्यात मानाच्या गदा याशिवाय रोख रकमेंचा देखील मल्लांवर वर्षाव करण्यात आला. वाघोलीमध्ये महिलांच्या कुस्त्यांना देखील व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचा देखील गुणगौरव ट्रॉफी व रोख रक्कम बक्षीसांद्वारे करण्यात आला.
तसेच पारंपारिक पद्धतीने कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या लोकनाट्याचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वाघोलीत भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, दानशूर मंडळी, ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने पारंपारिक पद्धतीने श्री भैरवनाथ देवाचा उत्सव सहा दिवस संपन्न होऊन तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.
शिरूर हवेलीच्या आमदारपदी ज्ञानेश्वर कटके यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. वाघोलीचा सुपुत्र पहिला आमदार झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मुलींच्या कबड्डी स्पर्धेच्या कर्णधारपदी वैभवी जाधव हिच्या निवडीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र श्री हा किताब पटकावल्याबद्दल शुभम पवार यांचा देखील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
वाघोलीत अनेक वर्षाच्या परंपरेचे पालन करण्यासाठी वाघोली भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, विविध तरुण मंडळे, ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून श्री भैरवनाथ देवाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. पारंपारिक सणाला आधुनिकतेची जोड देऊन त्याची जपणूक करण्यात आली.
रामभाऊ दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य





