पाचगणी – पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे नाव आल्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. अग्रवाल यांच्या महाबळेश्वर येथील एम पी जी क्लब नामक रिसॉर्टवर आज (शनिवारी) बुलडोझर फिरवण्यात आला आहे. रहिवाशी भाडेपट्टीवर असलेल्या या जागेचा वाणिज्य कारणासाठी वापर होत असल्याचे आढळून आले होते. यानंतर हा एम पी जी क्लबवर प्रशासनाने टाळे ठोकले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतल्यानंतर या जागेवर उभारण्यात आलेल्या १२ अनधिकृत खोल्या जमिनोदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. शनिवारी सकाळीच महाबळेश्वर नगरपालिकेने अनधिकृत बांधकामे जमिनोदोस्त करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांचे आदेश अग्रवाल कुटुंबाच्या महाबळेश्वर येथील अनधिकृत मालमत्तेचा प्रश्न चर्चेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत वक्तव्य केलं होत. अग्रवाल यांच्याशी संबंधित प्रकरणात जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी कारवाई करावी असे आदेश त्यांनी दिले होते.