शिरूर : शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे पिराची वस्ती येथून एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून ५० हजार रुपयांची म्हैस अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपक सोपान रणसिंग (वय २८ वर्षे, व्यवसाय शेती, रा. निमगाव दुडे, पिराची वस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २१ जून रोजी रात्री १२ ते ३ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिपक रणसिंग यांच्या राहत्या घरासमोरील छप्पराच्या गोठ्यामधून एक काळ्या रंगाची, दिल्ली जातीची, बारीक शिंगाची, वयाने सुमारे दोन वर्षांची म्हैस अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. सदर म्हैस ही पिवळ्या दोरीमध्ये गुलाबी रंगाचे पाईप तोंडाला बांधलेली असून तिच्या नाकावर खडडा आहे. चोरीला गेलेल्या म्हशीची अंदाजे किंमत ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. शेतकरी दिपक रणसिंग यांना २५ जून रोजी दुपारी २.५० वाजता ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार अज्ञात चोरट्याने मुददामपणे लबाडीच्या हेतूने स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी ही चोरी केल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच स्थानिकांच्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे गतिमान केली असून, लवकरच आरोपीचा माग काढण्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.