उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

मुंबई : सोमवारपासून अर्थात 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला सरकारकडून आयोजित करण्यात येणाऱ्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. विरोधकांकडून सरकारला घेरण्यासाठी तयारी केली आहे. लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, संतोष देशमुख हत्याकांड, कृषी विभाग घोटाळा, प्रशांत कोरटकर प्रकरणावरून सरकारला घेरणार, असे पत्रकार परिषेदतून दिसून आले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांतील नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा बंगल्यावर पार पडली. यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार भाई जगताप, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील प्रभू, आमदार आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीतील अन्य नेते उपस्थित होते.
अंबादास दानवे म्हणाले, संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे तीन महिन्यांपासून फरार आहे. प्रशांत कोरटकर हा मस्ती आलेला व्यक्ती इंद्रजित सावंत यांना धमकी देतो. प्रशांत कोरटकरला सरकार संरक्षण देते. तसेच कोश्यारी यांची परंपरा कायम ठेवत राहूल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला.
300 कोटींचा कृषी विभागात घोटाळा झाला आहे. आरोग्य विभागातील कंत्राटाला आणि एसटीच्या 1310 बसेसला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. याचाच अर्थ आधीचे सरकार भ्रष्टाचारी होते. त्यावर सरकार पांघरून घालण्याचे काम करत आहे, असा आरोप दानवेंनी केला. आरटीओच्या माध्यमातून नंबर प्लेट लावले जात आहे. पण, बाकीच्या राज्यांतील आणि आपल्या येथील नंबरप्लेटचे दर पाहिजे, तर तिप्पट आहेत. ही नंबर प्लेट लावल्याने कोणती सुरक्षा होणार आहे? मुंबईचे आर्थिक महत्त्व कमी झाल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.
100 टक्के सोयाबीन खरेदी झाले नाही. व्यापारी शेतकऱ्यांचे सोयाबीन लुटत आहे. कापूस, हरभरा, मुगाची सुद्धा हीच स्थिती केली आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती. शेतकऱ्यांना खोटे प्रलोभन दिले, असे दानवे यांनी म्हटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने सरकारचे पालकमंत्री मोठ्या पद्धतीने आरेरावी करतात. मोठा भ्रष्टाचार होत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांना रस्त्यावर आले आहेत.
पण, याला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही. धारावीच्या पुर्नविकासाच्या नावाखाली 6 पट जमीन अदानींना देण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप दानवेंनी केला. लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्वी सरकारने जाहीर केली होती. प्रलोभन देऊन लाडक्या बहिणींची मते घेतली. आता 10 लाखांवरती लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र ठरवले आहे. सरकारचे तीन बाजूला तीन तोंड आहेत. त्यामुळे चहापानावर बहिष्कार टाकला आहे, असे दानवेंनी सांगितले.
पत्रकार परिषदेतील मुद्दे
शेतकरी, माता-बहिणींचे संरक्षण, विकासाचे प्रश्न
सगळे कंत्राटदार संपावर आहेत
शक्तीपीठाचा मार्ग बळजबरीने केला जात आहे
गुत्तेदारांना निधी मिळत नाही
राज्याच्या डोक्यावर आठ लाख कोटींचे कर्ज आहे
जाहीरातींवर हजारो कोटींचा खर्च





